CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:37 PM2019-12-22T12:37:31+5:302019-12-22T12:58:03+5:30

काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काय केलं; नितीन गडकरींचा सवाल

Citizen amendment act is not against muslims says central minister nitin gadkari slams congress | CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

Next

नागपूर: काँग्रेसनं मुस्लिमांना केवळ व्होट मशीन मानलं. त्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपुरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 




हिंदू असणं पाप आहे का, असा सवाल उपस्थित करत नितीन गडकरींनी शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पाकिस्तानमध्ये आधी 19 टक्के हिंदू होते. आता तिथे केवळ 3 टक्के हिंदू आहेत. मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात 100 ते 150 देश आहेत. मात्र हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही, असं गडकरी म्हणाले. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींनी शरणार्थींना संकटकाळी आधार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकार तेच करतंय. शरणार्थींना नागरिकत्व देतंय. त्यात काय चुकलं, असा सवाल त्यांनी विचारला.

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लिमांवर कोणताही अन्याय होणार नाही. नवा कायदा अल्पसंख्यांक विरोधी नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनं परदेशी लोकांसाठी रेड कार्पेट अंथरलं. व्होट बँकेसाठी त्यांनी राजकारण केलं. मात्र संघात कधीच द्वेष शिकवला नाही. मुस्लिमांना देशाबाहेर काढा असं कुणीही म्हटलेलं नाही. आम्ही धर्म न पाहता विकास करतो, असं गडकरी म्हणाले. 

भारतानं कायम सर्वांना स्वीकारलं आहे. आपण विस्तारवादी नाही. रतन टाटा पारशी आहेत. तरीही देशानं त्यांचा स्वीकार केला. आपण कुठलाही भेदभाव करत नाही. आपल्या देशाच्या मुस्लिमांना सौदीमध्ये हिंदुस्तानीच म्हणतात. हिंदुत्व देशाची संस्कृती आणि ओळख आहे. आम्हाला कुणी सहिष्णुता शिकवू नये, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. व्हॉट बँकेसाठी काही पक्ष लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.  

अस्पृश्यता, जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राम मंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यानेच ठेवली आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व असल्याचं स्पष्ट करत गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा दाखला दिला. शिवरायांनी कधीच जातीय भेदभाव केलेला नाही. त्यांनी एकही मशीद तोडली नाही. तेच आमचे आदर्श आहेत, असं गडकरींनी सांगितलं. 
 

Web Title: Citizen amendment act is not against muslims says central minister nitin gadkari slams congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.