तुळजापूर मंदिर गैरव्यवहारांची सीआयडी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:07 IST2019-06-21T02:47:07+5:302019-06-21T07:07:41+5:30
गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची माहिती

तुळजापूर मंदिर गैरव्यवहारांची सीआयडी चौकशी
मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.
तुळजाभवनी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडा प्रकरणी सदस्य नीलम गोऱ्हे लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर केसरकर म्हणाले की, तुळजाभवानी देवस्थानचा खजाना व जमादारखान्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या- चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य गुप्त वार्ता विभाग (सीआडी) मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी २००१ ते २००५ या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा टाकून सात लाख १० हजार रुपये तसेच संगणक मॉनिटर चोरुन नेल्याप्रकरणी प्राप्त फियार्दीवरुन ठाणे ग्रामीण पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून तीन लाख ७८ हजार ८०६ रुपये रोख रक्कम, दोन मोटार सायकली, हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. रवींद्र फाटक, जोगेंद्र कवाडे, गिरीष व्यास, मनिषा कायंदे, आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.