स्कूल बसमध्ये दप्तर अडकल्याने चिमुकलीचा लोहगावात मृत्यू
By Admin | Updated: June 27, 2016 00:53 IST2016-06-27T00:53:59+5:302016-06-27T00:53:59+5:30
स्कूल बसच्या दरवाजामध्ये दप्तर अडकल्यामुळे हिसका बसून तोंडावर आपटलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्कूल बसमध्ये दप्तर अडकल्याने चिमुकलीचा लोहगावात मृत्यू
पुणे : स्कूल बसच्या दरवाजामध्ये दप्तर अडकल्यामुळे हिसका बसून तोंडावर आपटलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशन आॅफिसर्स क्वाटर्स येथे घडला होता. आरोपी स्कूल बसचालक स्वत: पोलिसांकडे हजर झाला असून, त्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
अवनी धर्मेंद्रकुमार (वय ५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी बाळू नामदेव हटकर (वय २६, रा. मोझेआळी, लोहगाव) या स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनी
वायुदलाच्या केंद्रीय विद्यालयात ज्युनिअर केजीमध्ये शिकत होती. तिचे वडील वायुदलामध्ये अधिकारी आहेत. तिला शाळेमध्ये नेण्या- आणण्यासाठी स्कूल बस लावलेली आहे. शुक्रवारी दुपारी अवनी शाळा सुटल्यानंतर, या स्कूल बसमधून घरी येत होती. एकेका विद्यार्थ्याला सोडत सोडत अवनीला सोडण्याचे ठिकाण आले.
ती खाली उतरत असताना तिच्या दप्तराचा बंद अॅटोमॅटीक बंद होणाऱ्या दरवाजामध्ये अडकला. हटकर याने बस सुरू करून पुढे घेतली असता, अवनीला हिसका बसला. अवनी तोंडावर आपटल्यामुळे गंभीर जखमी झाली. डोक्याला मार लागून तिच्या नाकामधून रक्त आले होते. हटकर याने तिला दुसऱ्या स्कूल बसमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर, तो स्वत: पोलिसांकडे हजर झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.