...तर भाजपापेक्षा सेनेचेच नुकसान, राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी हे तुम्हीच ठरवा, खास मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 07:28 IST2018-01-28T06:05:40+5:302018-01-28T07:28:14+5:30
स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे याचा विचार शिवसेनेने करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. ते लोकमतशी बोलत होते.

...तर भाजपापेक्षा सेनेचेच नुकसान, राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी हे तुम्हीच ठरवा, खास मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला
- यदु जोशी
मुंबई - स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे याचा विचार शिवसेनेने करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. ते लोकमतशी बोलत होते.
मुख्यमंत्री परदेशी असताना सेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावर ते म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढल्यास नुकसान केवळ भाजपाचे होणार नाही. शिवसेनेचे नुकसान अधिक होईल.
शिवसेनेने स्वबळावर लढण्याने भाजपाचे नुकसान होणार नाही का?
आम्ही काँग्रेससोबत लढणार असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. ते एकत्र लढणार असतील आणि शिवसेना वेगळी लढणार असेल तर नुकसान कोणाचे याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा. विरोधी पक्षांना मदत होईल, असा अजेंडा आखायचा का हे त्यांना एकदा ठरवावे लागेल.
शिवसेना ठाम राहिली तर?
...तर आमचीही स्वबळाची तयारी आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो आणि सर्वाधिक जागा जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढूनही क्रमांक एकचे स्थान पटकावले. वेगळे लढूनही जिंकू शकतो हे भाजपाने सिद्ध केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे जे वेगवेगळे सर्व्हे येताहेत त्यातही भाजपाच अव्वल आहे.
नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही?
राणे यांचा पक्ष एनडीएमध्ये आल्याने आम्हाला बळच मिळालेले आहे. त्यांच्याबाबतचा निर्णय लवकरच झालेला दिसेल.
ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे, असे म्हटले आहे. खडसेंबाबत आपली भूमिका काय?
खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपाला त्यांची गरज आहे. ते उद्विग्नतेने काही बोलले असतील. त्यांच्या मनात काय गैरसमज आहेत ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. कधीही पक्ष सोडणार नाहीत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलीस हेरगिरी करीत असल्याचा आरोप केला आहे...आपली प्रतिक्रिया?
राज्यातील विरोधी पक्षांमध्ये दमदार कामगिरी असलेला नेताच दिसत नाही. ‘कामगिरी’च नसलेल्यांची ‘हेरगिरी’ कशाला करणार? गमतीचा भाग जाऊ द्या पण विखे यांनी जो आरोप केला आहे त्याची मी निश्चितच चौकशी करेन.
मॅग्नेटिक महाराष्ट्रसाठी डाओसमध्ये पेरणी
डाओसमधील वर्ल्ड एकॉनॉमिक फोरममध्ये दरवर्षी चीनचा बोलबाला असतो. यंदा मात्र भारताचाच बोलबाला होता आणि त्याचा फायदा घेत फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणाºया ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली पेरणी आपल्याला करता आली, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.