मुख्यमंत्र्यांनी घेतली मग्रारोहयो मजुरांची हजेरी
By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T01:00:22+5:302014-11-30T01:00:22+5:30
सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली मग्रारोहयो मजुरांची हजेरी
अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा : अहवाल सादर करण्याचे आदेश
नरेंद्र जावरे - चिखलदरा
सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली. हजेरी घेताना त्या नावाची व्यक्ती तीच का? यासाठी प्रत्यक्ष चेहरा ओळखसुध्दा करुन घेतली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) कामावरच आदिवासींसोबत संवाद साधला. केवळ आठ दिवसांपूर्वीच हे काम सुरू झाल्याचे उघडकीस आले.
मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एक दिवसीय मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील मालूर, चौराकुंड, हरिसाल, उतावली, राणापीसा आदी गावांना भेटी देऊन तेथील आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळांची स्थिती जाणून घेतली. त्यांनी थेट आदिवासींच्या घरात व गोठ्यात जाऊन पाहणी केली.
गावकऱ्यांसोबत बसून संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
अधिकाऱ्यांना खडसावले
मालूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत केवळ आठ दिवसांपूर्वीच काम सुरु करण्यात आल्याचे आदिवासींनी सांगताच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. माझा दौरा पाहून काम सुरु करण्यात आले हे योग्य नाही. मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करावीत आणि आदिवासींचे स्थानांतरण रोखण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी आपला खोटारडेपणा थांबवावा, अशी ताकीद दिली.
अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी
आदिवासी गावांमधील शेतीसाठीसुद्धा जलसंधारणाचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. मेळघाटातील प्रत्येक आदिवासीच्या हाताला काम देण्याची जबाबदारी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
लाल धुरात हरविला ताफा
मालूर गावाला मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे एक दिवसापूर्वी प्रशासनाला सांगण्यात आले. सर्व यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली होती. मालूर गावापर्यंत रस्त्यावर लाल माती टाकण्यात आली. गावात निर्मल ग्रामस्वच्छता अभियानातून शौचालय उभारण्यात आले. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीचे भाग्य रंगरंगोटीने उजळले. वाहनांचा ताफा जाताना लाल मातीच्या धुरामुळे पुढील रस्ताच बेपत्ता झाला होता. पांढऱ्याशुभ्र वाहनांवर लाल मातीचा थर बसला होता. शनिवारी जवळपास पाच तास दौरा करुन मुख्यमंत्र्यांनी आदिवासींना आश्वासित करीत निरोप घेतला.