लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात गुरुवारी झालेल्या राड्यावर तीव्र संताप व्यक्त केला. राज्यातील जनता आज आपल्याला (आमदारांना) शिव्या देत आहे. कोण्या एका व्यक्तीची नाही तर येथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आपल्या सगळयांच्या बद्दल बोलले जात आहे की हे सगळे आमदार माजले म्हणून... या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमदारांना सुनावले.
ही विधानसभा आमदार, मंत्री, कर्मचाऱ्यांची नसून ती राज्यातील १४ कोटी जनतेची आहे. या अधिवेशनात ज्या घटना घडल्या त्यामुळे काय संदेश घेऊन आपण लोकांसमोर जाणार? या विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांतून संदेश जाणार असेल तर सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. आमदार सत्तेचा गैरवापर करतो, असे लोकांचे मत तयार होते, असेही मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले.
ना हनी, ना ट्रॅपकुठला हनीट्रॅप आणला? नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे, असे सांगत ना हनी आहे, ना ट्रॅप. ट्रॅपसंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. कुठल्याही आजी-माजी मंत्र्याचे हनीट्रॅप नसल्याचेही ते म्हणाले. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात तक्रार होती, ती तिने मागेही घेतली. ज्या व्यक्तीचा आपण वारंवार उल्लेख करताय तो काँग्रेस पक्षाचा माणूस आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.
प्रवेश पास ५-१० हजारांत विकले जातात, विरोधकांचा आरोप
विधानभवनात प्रवेशासाठी दिले जाणारे पासेस ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा गंभीर आरोप आ. शशिकांत शिंदे व आ. अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी याची अतिशय गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.हाणामारीनंतर विधानभवनातील प्रवेशावर निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र काहींनी चूक केली म्हणून आपण सगळ्यांना शिक्षा देऊ शकत नाही. या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून लोकांना प्रवेश दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत म्हणाले.
विधानभवन राडा : देशमुख, टकले यांना अटक; जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातही गुन्हा दाखलविधानभवन राडा प्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवत हृषिकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले आणि नितीन देशमुख यांना मध्यरात्री अटक केली. दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोरच स्वत:ला झोकून दिल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर त्यांना गाडीसमोरून फरपटत बाजूला करण्याची वेळ पोलिसांवर आली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरोधातही शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.