मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
By योगेश पांडे | Updated: December 14, 2025 11:43 IST2025-12-14T11:41:27+5:302025-12-14T11:43:05+5:30
RSS Headquarters Nagpur: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप व शिंदेसेनेच्या मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
- योगेश पांडे
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप व शिंदेसेनेच्या मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र काही सत्ताधारी मंत्री व आमदारांनी मात्र यावेळी दांडी मारली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) आमदारदेखील पोहोचले नाहीत.
संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. संघाकडून आमदारांसाठी दरवर्षी अधिवेशन काळात उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते होते. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात येते. यंदा केवळ सात दिवसच अधिवेशन असल्याने संघाकडून परिचय वर्ग होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीमबागेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले. सकाळी साडेसात वाजेनंतर आमदार व मंत्री रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरवर्षी संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र यावेळी हे उद्बोधन संघाकडून टाळण्यात आले. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. संघाकडून अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनिल देशपांडे, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे हे उपस्थित होते.
काही मंत्र्यांची दांडी का ?
दरम्यान, रेशीमबागला भाजप व शिंदेसेनेचे काही मंत्री व आमदार पोहोचलेच नाही. ते का पोहोचले नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील राष्ट्रवादीचे आमदार पोहोचले नाही.
फडणवीस-शिंदेंमध्ये ‘कॉफी’वर चर्चा
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महर्षी व्यास सभागृहातून बाहेर पडत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तेथे दोघांचीही भेट झाली व मुख्यमंत्री शिंदेंसोबत परत आत गेले. यानंतर दोघेही बराच वेळ आतमध्ये सोबत होते व कॉफी घेत त्यांच्याच चर्चा झाली.