महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:45 IST2025-07-11T21:45:46+5:302025-07-11T21:45:58+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Chief Minister Devendra Fadnavis informed that 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj have been included in the UNESCO World Heritage List | महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj: भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडसह ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याबाबतचा अहवाल तयार करून तो युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे पाठवला होता. या मागणीची दखल घेत शिवनेरी, रायगडसह राज्यातील ११ आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स पोस्ट केली आहे.

"ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण!!! आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन...छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो," असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis informed that 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj have been included in the UNESCO World Heritage List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.