Devendra Fadnavis Supriya Sule: 'अकेला देवेंद्र क्या करेगा', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या या जुन्या विधानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "सुप्रियाताई खरं बोलल्या होत्या, देवेंद्र एकटा नाहीये, हे त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं."
नागपूरमध्ये अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीसांनी सुप्रिया सुळेंच्या विधानाचा उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस काय बोलले?
"एकदा सुप्रियाताई (सुप्रिया सुळे) एकदा असं म्हणाल्या होत्या की, अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं. अकेले देवेंद्र की कोई औकात नहीं. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता. पण, त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं की, देवेंद्र एकटा नाहीये, पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याच्यासोबत आहे."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, " आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते. मोदी साहेबांसारखे, गडकरी साहेबांसारखे नेते ज्याच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचे आकलन कधीच त्यांना येऊ शकत नाही. म्हणूनच आज हा विजय मिळाला, हा त्या शक्तीचा विजय आहे. ती शक्ती संघटीतपणे, अखंडितपणे आपल्या पाठीशी उभी होती."
फडणवीस म्हणाले, आज अटलजी सर्वाधिक आनंदी असतील
मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालाही उजाळा दिला. ते म्हणाले, "आज स्वर्गामध्ये अटलजी सर्वाधिक आनंदी असतील. ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवी उभारी त्यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, पश्चिमी तटावर उभं राहून मी सांगतो की, अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल. हे त्यांनी होताना बघितलं."
"२०१४ साली मोदीजींच्या रुपाने पूर्ण बहुमताचे सरकार आणि आज महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय; एकट्या भाजपला १३२ जागा आणि महायुतीला २३७ जागा, हा प्रचंड मोठा विजय मिळाला", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.