CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्वीय सहाय्यकाच्या मार्फत मुंडे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याचे समजते. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव हा निर्णय घेत असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून सांगितलं. मात्र या राजीनाम्यामागे वेगळीच कहाणी असल्याची बाब आता समोर आली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल ८० दिवस होऊन गेले आहेत. हत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच या घटनेमागे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी मंत्रिमंडळातून बाहेर राहावं, अशी मागणी विविध स्तरातून होत होती. परंतु हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी धुडकावून लावत होते. त्यामुळे आता असं नेमकं काय घडलं की त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका आणि निर्णय झाला!
भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर आरोपी कोणीही असो, त्याला शिक्षा तर होणारच, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली होती. तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मुख्यमंत्र्यांचे मत असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी तीन ते चार वेळा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली होती. परंतु धनंजय मुंडे मात्र राजीनामा देण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत नुकतेच सीआयडीकडून देशमुख प्रकरणातील आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. वाल्मीक कराड हाच हत्येमधील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट झालं. त्यातच देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि त्यांच्या मृत शरीराची केलेली विटंबना दाखवणारे आरोपपत्रातील फोटो समाजमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याने जनआक्रोश वाढला.
दरम्यान, राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. तुम्ही राजीनाम्याचा निर्णय न घेतल्यास मला तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत धनंजय मुंडे यांना दिल्याचं समजते. त्यानंतर अखेर मुंडे यांनी आज राजीनामा दिला. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
राजीनाम्यामागे धनंजय मुंडेंनी कोणतं कारण सांगितलं.
राजीनाम्याची माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं मुंडे यांनी म्हटलं होतं.