CM Devendra Fadnavis Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे वादाच्या वावटळीत सापडले आहेत. वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरले असून, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मीक कराडने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. वाल्मीक कराडच्या शरणागतीबद्दल आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीच्या शोधाबद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.
यावेळी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल फडणवीस काय बोलले?
"मला या प्रकरणातील राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतोय, कुणाही विरोधात पुरावा असेल, तर द्या. ज्याच्या विरोधात पुरावा असेल... आम्ही शोधतोय, दुसऱ्या कोणाजवळ असेल, तर त्यानेही द्यावा", अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ -फडणवीस
"माझ्या करिता स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणं, हे महत्त्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, त्यात काही फायदा होईल. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही. त्याचं समर्थनही करायचं नाही. त्याचा विरोधही करायचा नाही. त्यांनी त्यांचं राजकारण करत राहावं, मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे की, स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा. तो आम्ही मिळवून देऊ", अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.