मुख्यमंत्र्यांनी विकत घेतला चिवडा आणि चकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 05:42 IST2016-08-02T05:42:35+5:302016-08-02T05:42:35+5:30
सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या स्टॉलवर खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले

मुख्यमंत्र्यांनी विकत घेतला चिवडा आणि चकल्या
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या स्टॉलवर खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी चिवडा, चकल्या यासारखे अनेक खाद्यपदार्थ विकत घेतले. प्रत्येक स्टॉलवर जाऊन मुख्यमंत्री प्रत्येक पदार्थाची माहिती घेत होते, महिलांची विचारपूस करत होते आणि त्यांचे हे रूप पाहून बार्शी तालुक्यातून आलेल्या महिला हरखून गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्वत:साठीच नाही, तर आपल्या स्टाफसाठीदेखील खरेदी केली हे विशेष!
निमित्त होते, सचिवालय जिमखान्याच्या हॉलमधील महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या प्रदर्शन व विक्रीचे. बार्शीच्या आरएसएम सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मिरगणे यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या कुरड्या, शेवया, पापड, मसाले, चटण्या यांच्यासह गावरान खाद्यपदार्थांची येथे लयलूट आहे. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजय देशमुख यांनीदेखील प्रत्येक स्टॉलला भेट देत, तेथे आलेल्या महिलांसोबत फोटोही काढून घेतले. एरव्ही फोटोत पाहायला मिळणारे नेते आपल्यासोबत फोटो काढून घेत आहेत, हे पाहून त्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
मंत्रालय व आजूबाजूच्या भागांतील लोकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांची खरेदी केली. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’चा पुरस्कार प्राप्त देशी गायींचे गोपालक अब्दुल रज्जाक शेख यांचाही स्टॉल येथे होता. दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या जवळपास ६० महिला व शेतकऱ्यांनी बनवलेल्या या वस्तू असल्याने त्यांना आम्ही ‘मदर टच’ असे नाव दिल्याचे मिरगणे यांनी सांगितले. या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. (प्रतिनिधी)