मुख्यमंत्री हेच भाजपाचे ट्रम्प कार्ड
By Admin | Updated: January 21, 2017 02:24 IST2017-01-21T02:24:16+5:302017-01-21T02:24:16+5:30
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची रणनीती भाजपाने आखली आहे

मुख्यमंत्री हेच भाजपाचे ट्रम्प कार्ड
गौरीशंकर घाळे,
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठीदेखील भाजपाने मुख्यमंत्री फडणवीस यांचाच चेहरा समोर केला आहे. उत्तर भारतीय संमेलनात सहभागी होणारे, छटपूजेला येणारे, फेरीवाला धोरण राबविणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे केला जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत गुजराती आणि उत्तर भारतीय मतांवर भाजपाची मोठी मदार आहे. शिवाय मराठी अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेनेही भाषिक आणि धार्मिक गणित ध्यानात घेत गुजराती, उत्तर भारतीय नेत्यांना जवळ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. वर्षभरापासूनच दोन्ही पक्षांनी अधिकाधिक अमराठी नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे धोरण राबविले. त्यानंतर आता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांची धडपड सुरू आहे. एरव्ही उत्तर भारतीय नेते आणि कलाकारांच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना जवळ करण्याचे प्रयोग मुंबईत झाले. यंदा मात्र देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले विविध निर्णय आणि उत्तर भारतीय समाजाच्या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. मुख्यमंत्री सबका साथ, सबका विकास या भूमिकेनुसार काम करतात. उत्तर भारतीय नेत्यांचा अपवाद वगळता अन्य नेत्यांनी आतापर्यंत उत्तर भारतीय समाजाच्या कार्यक्रमांपासून स्वत:ला विशिष्ट अंतरावरच ठेवले होते. फडणवीस यांनी प्रथमच त्याला छेद देत उत्तर भारतीयांना जवळ केल्याचा दावा भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत केलेली कामे आणि उत्तर भारतीयांबद्दलच्या सकारात्मक मानसिकतेचा दाखला दिला जात आहे. एकीकडे पारंपरिक पद्धतीने उत्तर भारतीय मतदाराला आळवतानाच विकासाची, भाषेची जोड दिल्याने भाजपाला फायदा होईल असा कयास भाजपातील उत्तर भारतीय नेत्यांनी मांडला आहे.
।चौपालचा प्रभावी वापर
चौपाल आणि त्यावर रंगलेला गप्पांचा फड म्हणजे उत्तर भारतीय समाजजीवनाचे अविभाज्य अंग. म्हणूनच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या प्रचाराची सुरुवात या चौपालांवरील चर्चेने केली. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरीत चौपाल अप्रुपाचीच गोष्ट. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपाने जागोजागी चौपालाचे कार्यक्रम हाती घेण्याचा सपाटा लावला आहे.
कुलाबा येथे समुद्रकिनारी, दहिसर येथील गणपत पाटील नगर वगैरे भागांत चौपालाचे आयोजन करण्यात आले. या चौपालांच्या गप्पांमधून हरहुन्नरी कार्यकर्ते राज्य सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी पार पाडतात. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छट पूजा केली आणि छट पूजेचे व्रत धरणाऱ्या लोकांचे आशीर्वादसुद्धा घेतले. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची छबी ठसविण्यात येते.
।लिट्टी चोखा आणि बाटी चोखाचा फर्मास बेत
हिवाळ्यात बाटी चोखा हा खास पदार्थ उत्तर भारतात आवडीने खाल्ला जातो. भाजपा समर्थकांकडून ठिकठिकाणी धूमधडाक्यात बाटी चोखाचे आयोजन करण्यात येत आहे. या लज्जतदार पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी उत्तर भारतीय लोकांसमवेत अन्य भाषिकही सहभागी होत आहेत.
स्थानिक भाजपा नेते आणि आमदार अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतील याची काळजीही घेतली जात आहे.
।उत्तर प्रदेश दिन
२४ जानेवारी हा दिवस उत्तर प्रदेश दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने मुंबईतही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा ‘आयोजन’ या संस्थेच्या वतीने उत्तर प्रदेश दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजीत मिश्रा यांनी दिली. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे.
।सोशल मीडियावरही भर
जाहीरपणे वारंवार भाषिक कार्यक्रम घेणे अडचणीचे ठरण्याची शक्यता असते. ही बाब ध्यानात घेऊन फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा भाजपासह सर्वच पक्षांनी पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली आहे. गाव, जिल्हा अथवा विशिष्ट भागातील लोकांचे ग्रुप बनविण्यात येत आहेत.