मुख्य अभियंत्याला भोवली बदली
By Admin | Updated: November 4, 2014 03:03 IST2014-11-04T03:03:06+5:302014-11-04T03:03:06+5:30
मागील सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री व कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वशिल्याने एका कार्यालयीन अधीक्षकाची ठाण्याहून मुंबईला बदली

मुख्य अभियंत्याला भोवली बदली
मुंबई: मागील सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री व कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वशिल्याने एका कार्यालयीन अधीक्षकाची ठाण्याहून मुंबईला बदली करणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना चांगलेच भोवले असून त्यांनी बदली केलेल्या या अधीक्षकास दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये द्यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला आहे.
सा. बांधकाम विभागाच्या ठाणे परिमंडळ अधीक्षक अभियंता कार्यालयातून मुंबई येथे दक्षता पथकात रावसाहेब दौलतराव महाले यांची केलेली बदली रद्द करताना ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए. एच. जोशी यांवी अलीकडेच हा आदेश दिला. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिफारशीनुसार कोकण भवन, बेलापूर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती एस. एस. गांगर्डे ठाण्याच्या कार्यालयात बदली देता यावी यासाठी महाले यांची ठाण्याहून मुंबईला बदली केली गेली होती. आता महाले पुन्हा ठाण्यात आल्याने श्रीमती गांगर्डे यांचे काय करायचे हे संबंधित अधिकाऱ्यांनी आपसात ठरवावे, असे निर्देशही ‘मॅट’ने दिले.
३१ जुलै रोजी बदली केली जाण्यापूर्वी महाले यांची जेमतेम अडीच वर्षांआधी ठाण्यात नेमणूक झाली होती. ते ‘वर्ग-क’चे अधिकारी असल्याने एका नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना सहा वर्षे ठेवणे अपेक्षित होते. त्याआधी बदली करण्यासाठी, बदली कायद्यानुसार, विशेष कारण देणे आणि वरिष्ठांची संमती घेणे गरजेचे होते. वस्तुत: कार्यालयीन सोयीसाठी असे कोणतेही खास कारण नसताना, केवळ मंत्र्यांकडून वशिला लावलेल्या श्रीमती गांगर्डे यांना हवी तेथे बदली देता यावी, यासाठी मुंबईच्या मुख्य अभियंत्यांनी या बदलीस संमती दिली होती.
महाले यांच्यासाठी अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी, गांगर्डे यांच्यासाठी अॅड. एस. पी. मंचेकर यांनी तर सा. बां.साठी श्रीमती के. एस. गायकवाड यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)