उदयनराजे कडाडले, सरकारकडे ३ मागण्या; "जर तुम्ही हे मान्य केले नाही तर..."
By प्रविण मरगळे | Updated: March 7, 2025 13:56 IST2025-03-07T12:55:06+5:302025-03-07T13:56:34+5:30
Chhatrapati UdayanRaje Bhosale - छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या असं आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

उदयनराजे कडाडले, सरकारकडे ३ मागण्या; "जर तुम्ही हे मान्य केले नाही तर..."
सातारा - छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या अशा विकृत लोकांची नसबंदीच केली पाहिजे. ते ना कुठल्या जातीचे, ना कुठल्या पक्षाचे, विकृत लोकांची ही विचारधारा आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर ही फक्त नावे आहे. उद्या कुणीही असो जर कायदा झाला तर कुणी महाराजांबाबत बोलायचे धाडस करणार नाही असं सांगत उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे ३ मागण्या केल्या.
उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत महाराजांच्या बदनामीची विधाने करण्याच्या वादावर संतप्त भूमिका घेतली. यावेळी उदयनराजे म्हणाले की, सत्ताधारी, विरोधक किंवा कुठल्याही पक्षाचे असू द्या, आज कित्येक निवेदन देऊन, सांगूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्यतेने आणला जात नाही. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. त्यामुळे इतिहासावरून जे वादविवाद होतात ते संपुष्टात येतील. आज कुणीही काहीही लिहितो, काल्पनिक चित्र रंगवतो याविरोधात सरकारने कायदा आणला पाहिजे. अनेक कुटुंब, घराणे असतील त्या लोकांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचले. एखाद्या काल्पनिक कथेवरून चित्रपट प्रसिद्ध करतात त्याआधी एका समितीसमोर ही स्क्रिप्ट गेली पाहिजे. त्यावर ते अभ्यास करतील. काल्पनिक कथेवर आधारे इतिहास मांडला जातो तेव्हा तेढ निर्माण होतो असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय छावा सिनेमानंतर कालच मला शिर्के कुटुंब भेटायला आले, संभाजी महाराजांना शिर्केंनी पकडून दिले असं कुठे इतिहासात नोंद नाही. आज कुठेही ते कुटुंब गेले तर लोकांची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलली असं ते सांगतात. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे करतात त्यांच्याविरोधात याच अधिवेशनात कायदा आणला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या, याच अधिवेशनात तुम्ही कायदा पारित करा अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल असंही उदयनराजेंनी सांगितले.
दरम्यान, कुणीही काही विधाने करतात, त्यातून तेढ निर्माण होतात, दंगली घडतात. लोक मृत्युमुखी पडतात, हे काम थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही तर विरोधक आणि सर्वच लोकप्रतिनिधींचं आहे. त्यामुळे या अधिवेशनात विशेष कायदा आणा, जर तुम्ही केले नाही असाच गोंधळ होत राहील. गोंधळ बंद करा, कायदा पारित करून अशा लोकांना शिक्षा करा. हा कायदा पारीत झाला नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. ही लोकांची मागणी आहे. जर तुम्ही कायदा आणणार नसाल तर तुमचं महाराजांवर अजिबात प्रेम नाही हे लोकांना वाटेल. जर खरेच छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल तर कुणीही असो, कुठल्याही पक्षाचे असतील हा कायदा याच अधिवेशनात पारित करा. जनतेच्या भावना लक्षात घेऊन जर तुम्ही वागला नाही तर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी सरकारला दिला.
लोकशाहीची संकल्पना महाराजांनीच मांडली...
या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन गेला, ज्यांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्यासाठी नाही तर लोकांवरील अन्याय थांबवण्यासाठी आयुष्याचा एक एक क्षण मोजला. लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला. सर्वधर्म समभावाचा विचार महाराजांनीच दिला त्यातून लोकांनी एकत्रित करत स्वराज्य निर्माण केले. बाहेरून येणारे आक्रमण परतून लावले ते या देशातील वेगवेगळ्या समाजातील लोकांच्या जीवावर केला. प्रत्येक वेळी शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी कुणीही उठायचं, काहीही वक्तव्य करायचे असं सुरू आहे. महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. पक्ष कुठलाही असला तरी महाराजांचे नाव घेऊनच सर्व पक्षांची सुरूवात होते. आज जो आपण मोकळा श्वास घेतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी लोकशाहीची संकल्पना मांडली होती. परंतु आज काय चाललंय...? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उदयनराजे यांच्या ३ मागण्या काय?
- छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासाबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्याविरोधात कठोर कायदा
- छत्रपतींचा इतिहास शासनमान्य करून खंड पद्धतीने तो प्रकाशित करण्यात यावा
- सिनेमॅटिक लिबर्टीतून जो इतिहास मांडला जातो, काल्पनिक चित्र रंगवलं जाते, त्याआधी संबंधित सिनेमाची कथा एका समितीकडून पडताळली जावी, त्या समितीने अभ्यास करून त्याला मान्यता दिल्यानंतरच सिनेमा प्रदर्शित केला जावा.