चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच
By Admin | Updated: January 21, 2017 01:33 IST2017-01-21T01:33:23+5:302017-01-21T01:33:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत

चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत. पक्षात एवढा अन्याय झाला, तर २५ वर्षे काय करीत होतात. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका महापौर शकुंतला धराडे यांनी भाजपाच्या नेत्यांचे नाव न घेता केली.
भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दादागिरी थांबवावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले होते. या टीकेचा समाचार महापौर धराडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे पक्षात राहून मोठे होऊन आणि स्वकर्माने विजनवासात गेलेल्या चव्हाण यांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. जनमाणसात काहीही स्थान नसताना पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आला आहे. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा आधार घेत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेले
आरोप हे विकृतपणाचे लक्षण
आहे. पक्षात जर एवढाच अन्याय होत होता, तर आजपर्यंत का पक्षात राहिल्या. दादागिरी आजच
दिसली का, ज्या पक्षाने महिलांना जास्त न्याय दिला त्याच नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)
पक्षामध्ये गुंड, चोर, खुनी, मटकेवाले होते; तर आपण २५ वर्षे आवाज का उठविला नाही. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आपणास अधिकार आहे का? आणि ज्यांच्या इशाऱ्यावर आपण बोलता त्यांची नैतिकता काय, हे जनता जाणून आहे. बगलबच्च्यांच्या संस्कारावर बोलण्यापेक्षा संस्काराची व्याख्या शिकून घ्या, अशी टीका धराडे यांनी केली.