बदलती तंत्रभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 04:11 IST2017-05-07T04:06:59+5:302017-05-07T04:11:31+5:30

भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते, हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे

Changing language | बदलती तंत्रभाषा

बदलती तंत्रभाषा

- अ. पां. देशपांडे -
भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते, हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे, तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इत्यादी बदलतात आणि तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते. त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळेही भाषा बदलते.
भाषा दर दहा कोसांवर बदलते हे आजच्या तरु णांना समजणार नाही. कारण कोस म्हणजे काय? दोन मैलांचा एक कोस होतो. पण मैल म्हणजे काय? अमेरिका सोडता जगात इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे जिथे मैल समजत नाही तिथे कोस आणखी कोसभर दूर राहिला. मग आता दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणण्याऐवजी दर ३२ किलोमीटरवर भाषा बदलते असे म्हणायला हवे. याशिवाय एका संज्ञेवरून दुसरी संज्ञा तयार होते, तिचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. त्याला अजून तरी पर्याय आले नाहीत. उदाहरणार्थ मोटार गाडीत, विमानात, आगगाडीत वेग मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. मैलांचे किलोमीटर झाले तरी मायलोमीटरचा मायलोमीटरच राहिला. त्याचा काही कायलोमीटर झाला नाही. दुसरे उदाहरण, आगगाडी येण्यापूर्वी मुंबईहून पुण्याला जाणारे टपाल घोड्यावरून जाई. पहिला टप्पा बदलापूरपर्यंतचा असे. तेथे घोडे बदलत व टपाल पुढे जाई. म्हणून त्या गावाला बदलापूर म्हटले जाई. पण आता टपाल आगगाडीने जात असल्याने बदलापूरचे घोडे बदलण्याचे स्थानमहात्म्य गेले, तरी त्या गावाचे नाव बदलापूरच राहिले. जसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव राहिले तसे. मैलावरून आलेली आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, दोन गावांच्या मध्ये मैलांचे दगड अंतरे दर्शवण्यासाठी लावलेले असतात. आता जी.पी.एस. सिस्टिममुळे अंतरे आपापल्या मोबाइलवर मिळत असली तरी मैलांचे दगड अस्तित्वात आहेत. ते अजून किलोमीटरचे दगड असे म्हणायची पद्धत पडली नाही. त्याशिवाय मनुष्याच्या आयुष्यातील, संस्थेच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना आपण माइल्स्टोन असे म्हणतो, त्याचे काय करायचे? उदाहरणार्थ, चाकांचा शोध हा मानवी उत्क्रांतीतील मैलाचा दगड मानला जातो. मी मैलोनमैल चालत जातो या गोष्टीला काय म्हणणार? इंग्रजीत या गोष्टीला माइलेज असा शब्द रूळला आहे आणि तो तर अनेक अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, एस.एस.सी. परीक्षेला पहिला आल्यामुळे एखाद्या मुलाला आयुष्यात खूप माइलेज मिळाले असेही आपण म्हणतो.
यार्ड, फूट, इंच ही परिमाणे मोजण्यामापनाची पद्धत, मेट्रिक पद्धत १९५७ सालापासून भारतात वापरली जाऊ लागल्यानंतर कालबाह्य ठरून आता मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर आले. मग वसंत बापटांची इंच इंच लढवू छाती ही काव्यातील ओळ कालबाह्य होणार का? इंग्रजीतील एक छान उदाहरण आठवते. दोज हू स्पीक इन यार्डस अँड मूव्ह इन इंचेस शुड बी ट्रीटेड विथ फूट.
फार पूर्वी सोने वगैरेसारख्या मौल्यवान गोष्टी तोलण्यासाठी गुंजा, मासा ही परिमाणे वापरत. (१६ गुंजा = १ मासा, १२ मासे = १ तोळा, आणि ९६ तोळे = १ शेर. एक शेर हा अंदाजाने १ किलोग्रॅम वजनाएवढा म्हणायचे) वैद्य लोकही औषधे देताना पूर्वी ही वजने वापरत. शिवाय ते ही भाषाही वापरत. उदाहरणार्थ, एखाद्याची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याची तब्येत तोळा-मासा झाली आहे म्हणत. गुंज ही लालभडक रंगाची असे. एखाद्या दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे जसे लाल होतात, तेव्हा त्याला तुझे डोळे गुंजेसारखे लाल झाले आहेत म्हणत. आता असे जर कोणा दारू प्यायलेल्याला म्हटले, तर तो म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही, तू काय गांजा-भांग घेतली आहेस का? पूर्वी पावशेर , म्हणजे शेराचा पाव भाग होता. आताही आपण पाव किलो म्हणतोच. पण दारू पिऊन आलेल्याला काय रे तू पावशेर मारून आलास का, असे विचारत नाही.
समाज तंत्रज्ञानात पुढे पुढे जातो तसतशी नवीन भाषा व्यवहारात येते आणि जुनी भाषा मागे पडत जाते.

 

Web Title: Changing language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.