दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंड वारे असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे. मात्र दिवसा असणारा उन्हाचा पारा हा येत्या उन्हाळ्याचा ‘ट्रेलर’ आहे असे दिसून येते. त्यामुळे भविष्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात पाणी जास्त पिणे, द्रवपदार्थांचे सेवन अधिक करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो, त्या वेळेस वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतात आणि याच काळात आरोग्यास फार जपावे लागते. पूर्वीच्या ऋतूमधील वातावरणाची शरीरास सवय झालेली असते. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम शरीरावर फार पटकन होत असतो. याचवेळी आहार-विहारावर फार नियंत्रण ठेवावे लागते. पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा आहार कदाचित पुढील ऋतूसाठी योग्य ठरू शकत नाही. परंतु, आहार-विहारातील बदल लगेच करू नयेत. पूर्वीच्या ऋतूतील आहार हळूहळू कमी करून पुढील ऋतूसाठी योग्य असणारा आहार सुरू करावा. जर हळूहळू क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला, तरच आरोग्य टिकून राहते. प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील दोष म्हणजेच वात, पित्त व कफ यांची स्थितीही वेगवेगळी असते व त्यानुसार त्या व्यक्तीस शारीरिक समस्या उद्भवत असतात. प्रत्येक व्यक्तीने कुशल वैद्याच्या मार्गदर्शनाने आपली प्रकृती जाणून घेतली पाहिजे. आपल्या स्वत:ला आपली प्रकृती माहिती असल्याने योग्य तो आहार-विहार अवलंबणे सोपे जाते.या दिवसांत पाणीदार फळे आणि भाज्यांचा आहारात अधिक समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र म्हणून उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंबट, खारट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावेत. उलट गोड, कडू आणि तुरट स्वादाचे सेवन अधिक करावे. फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे पदार्थ खाऊ नयेत. ज्यांना उन्हाळा बाधत नाही अशांनी दह्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांचा आणि उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच शारीरिक समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचन संस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये असते. -- डॉ. आस्था शर्मा, आहारतज्ज्ञ
ऋतूप्रमाणे करा आहारात बदल
By admin | Updated: March 2, 2017 02:33 IST