गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडुकीवेळी सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सनसनाटी विजय मिळवला होता. या विजयानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं होतं. मात्र आता राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. मात्र भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा कुठलाही विचार नसल्याचे सांगत विशाल पाटील यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपा प्रवेशाची ऑफर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करून वाटचाल करावी लागते. विशाल पाटील यांच्याकडे अद्याप ४ वर्षे २ महिने एवढा खासदारकीचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे विशाल पाटील हे भाजपासोबत आले तर भाजपाचं केंद्रातील संख्याबळ वाढेल. तसेच सांगलीच्याही विकासाला चालना मिळेल.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना दिलेल्या ऑफरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुवात झाल्यावर विशाल पाटील यांनीही तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटील म्हणाले की, मी ज्या पद्धतीने काम करतोय, संसदेत प्रश्न मांडतोय, ते पाहून चंद्रकांत पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असावी. भाजपाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करत आहे, असं मी समजतो. मात्र भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा कुठलाही विचार नाही आहे. तसेच मी कायदेशररीत्याही कुठल्याही पक्षात जाऊ शकत नाही, असेही विशाल पाटील यांनी सांगितले.