देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:25 IST2025-04-17T19:20:34+5:302025-04-17T19:25:22+5:30
Devendra Fadnavis News: फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे व इतर नागपूरच्या सात मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी याचिका दाखल केली होती.

देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्याने याचिका दाखल केली होती. विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या विजयाला त्यांनी आव्हान दिले होते. या याचिकेवर उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले आहेत.
फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे व इतर नागपूरच्या सात मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी याचिका दाखल केली होती. गुडधे यांचा फडणवीस यांनी 39,710 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघांत निवडणूक घेताना आयोगाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. याची कारणे स्पष्ट केली नव्हती. ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने नव्हते असा आरोप गुडधे यांनी केला होता.
याचबरोबर पराभूत उमेदवारांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले ते दिले नाही, फॉर्म नंबर १७ दिले गेले नाहीत. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी पैसे मोजले परंतू ते देखील केले गेले नाही, माहिती अधिकार कायद्यात ही माहिती देणे बंधनकारक आहे, ती केली नाही, असे गुडधे यांनी याचिकेत आरोप केले होते.
या मतमोजणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचार झाल्याने फडणवीस यांचा विजय अमान्य घोषित करावा अशी मागणी पराभूत उमेदवार गुडधे यांनी न्यायालयाकडे केली आहे. यावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना ८ मे रोजी परत करावा लागणारा समन्स बजावला असल्याचे गुडधे यांचे वकील पवन दहत यांनी सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात आले नाही, असे दहत यांनी म्हटले आहे.