सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार!
By Admin | Updated: August 17, 2014 00:04 IST2014-08-16T23:14:30+5:302014-08-17T00:04:16+5:30
बुलडाणा येथे जिल्हानियोजन बैठकीत उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी ग्वाही दिली.

सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार!
बुलडाणा: सोयाबीनचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरल्या जाईल, अशी ग्वाही राज्याचे उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी शनिवारी येथे दिली.
सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी उलटल्याचे कारण पुढे करीत, पीक विमा कंपन्यांनी सोयाबीनला विम्याचा लाभ दिला नाही. ही बाब केंद्राच्या अखत्यारीत येत असून, या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीमध्ये चर्चा केली जाईल व केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असे उप मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेस संबोधित करीत होते.
पावसाअभावी बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर पिके माना टाकतील. या संदर्भात प्रशासन दक्ष असून, तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्यातील जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, ३१ डिसेंबरनंतर चारा टंचाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांणी यावेळी स्पष्ट केले.
सोयाबीन हे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे पीक असून, पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे यावर्षी इतर पिकांची लागवड करता आली नाही. दरम्यान सोयाबीनसाठीची पीक विम्याची मुदत उलटली. याबाबत शेतकर्यांनी तक्रारी केल्या असून, मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्यानंतर, केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असेही ते म्हणाले.