सेन्सॉर बोर्डाच्या सीईओने मागितली लाच
By Admin | Updated: August 15, 2014 02:56 IST2014-08-15T02:56:54+5:302014-08-15T02:56:54+5:30
एजंट श्रीपती मिश्रासह बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सेन्सॉर बोर्डाच्या सीईओने मागितली लाच
मुंबई : चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेले सेन्सॉर प्रमाणपत्र लवकर मिळविण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) राकेश कुमार यांच्या नावे ७० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अधिकृत एजंट श्रीपती मिश्रासह बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण मोहारे या अधिकृत एजंटच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ‘मोर दौकी के बीहाव’ हा छत्तीसगढमधील प्रादेशिक चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्वरित प्रमाणपत्र मिळावे यासाठी एजंट मिश्रा यांनी सीईओ कुमार यांच्या नावे ७० हजार रुपयांची लाच मागितली. सीबीआयने याप्रकरणी कुमार यांच्यासह मिश्रा आणि जैस्वाल यांच्या निवासस्थानी छापेही घातले. (प्रतिनिधी)