जातींचे मोर्चे हे महाराष्ट्राचे दुर्दैव
By Admin | Updated: October 12, 2016 06:20 IST2016-10-12T06:20:53+5:302016-10-12T06:20:53+5:30
राज्यात एकेकाळी शेतकरी व कष्टकऱ्यांचे मोर्चे निघायचे. तेथेच आज जातीचे मोर्चे निघतात हे दुुर्देव असल्याचे सांगत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे

जातींचे मोर्चे हे महाराष्ट्राचे दुर्दैव
अहमदनगर : राज्यात एकेकाळी शेतकरी व कष्टकऱ्यांचे मोर्चे निघायचे. तेथेच आज जातीचे मोर्चे निघतात हे दुुर्देव असल्याचे सांगत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासोबतच दलितांना मुख्य प्रवाहात का आणले गेले नाही, याचाही विचार झाला पाहिजे, असे सूचक भाष्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केले. लेकरांसाठी मी अहंकार व कटकारस्थानांचा बुरुज उतरून हिरकणी होऊन गडाच्या खाली आले, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
भगवानगडावर परवानगी नाकारल्याने गडाच्या पायथ्याशी झालेल्या मुंडे यांच्या मेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. मेळाव्यात मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या घटकपक्षांचे नेते मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांसह मंत्री प्रा. राम शिंदे व खासदार प्रीतम मुंडे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात सर्वच नेत्यांनी आक्रमक भाषणे करत आपण पंकजा यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. मुंडे यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात कोणावरही थेट टीका केली नाही. मात्र, सूचक विधाने केली. या गडाने मला कन्या मानले आहे. हा गड म्हणजे माझा बाप आहे. रायगडाचे दरवाजे बंद झाले तेव्हा हीरकणी बुरुजावरून खाली उतरली. आजही मी अहंकार सोडून माझ्या लेकरांसाठी बुरूज उतरून खाली आली आहे. मरेपर्यंत या गडाबाबत व येथील गादीबाबत अपशब्द काढणार नाही. माझ्या जीवनात सतत संघर्ष आहे. पण कितीदा मला घेरणार? पुढील वर्षी या गडाच्या गादीवरील महंतच मला कन्या म्हणून गडावर बोलावतील. गडावर कायदा-सुव्यवस्था बिघडते, पण गडाच्या खाली बिघडत नाही, याचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गडाचे ट्रस्टी, विरोधक व प्रशासनाबाबतही शंका उपस्थित केल्या.
सर्व जातीधर्म सुखाने नांदायला हवेत. मराठा समाजाला आजवर न्याय का दिला गेला नाही? ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांना शक्ती दिली पाहिजे. खोट्या अॅट्रॉसिटीची काही प्रकरणे झाली असतील. पण, दलितांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे सांगत ओबीसी, दलित, अल्पसंख्याक व बहुजनांना न्याय देण्याची गरज आहे. आम्ही सत्तेत तुमच्यासाठी आहोत, हे विसरणार नाही व कुणाला विसरूही देणार नाही, अशी सोशल इंजिनिअरिंगची भूमिका त्यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)
पाच आमदारांची उपस्थिती
भगवानगडावरील मेळाव्यासाठी व्यासपीठावर तीन मंत्री, दोन खासदार व पाच आमदारांची उपस्थिती होती. आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातील शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे व बाळासाहेब मुरकुटे, बीड जिल्ह्यातील भिमराव धोंडे, संगीता ठोंबरे, आर.टी. देशमुख व बुलढाण्याचे आमदार संजय कुटे यांचा समावेश होता. माजी आमदार गोविंद केंद्रे, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड, फुलचंद कराड, डॉ. अमित पालवे, ज्ञानोबा मुंडे, सर्जेराव तांदळे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
गडाने सत्तापरिवर्तन केले - खोत
भगवानगडाने राज्यात सत्तापरिवर्तन केले आहे. अठरापगड जातींना गोपीनाथ मुंडे यांनी या गडावरून एकत्र केले. मागील वेळी मी गडावर आलो होतो, त्या वेळी पंकजा यांनी पुढील वेळी जानकर व खोत हे मंत्री म्हणूून दसऱ्याला सोने लुटायला येतील, असे सांगितले होते. तसेच घडले असून, पंकजा यांना कोणीही एकटे पाडू शकत नाही. वाघासारखे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही भगवानबाबांना मानतो त्यांच्या दलालांना नव्हे. दसऱ्याला अड्यावरून खाली काढलेली शस्त्रे वापरायला लावू नका, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. राम शिंदे यांनीही आपणाला पंकजा यांच्यामुळेच जलसंधारण खाते मिळाले असल्याचे सांगितले. तर राज्यात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे सत्तांतर घडले असून, आमच्यासारख्या अनेकांना त्यांनी ताकद दिल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणाले.
पंकजांना रोखणे ही बारामतीची सुपारी - जानकर
पंकजा यांना भगवानगडावर रोखण्याचे काम ज्या चेल्या चपाट्याने केले त्याचे नाव ‘बारामती’ आहे, असे सांगत रासप नेते व मंत्री महादेव जानकर यांनी थेट शरद पवार, अजित पवार व धनंजय मुंडेंवर हल्ला चढविला. बारामतीचे व त्यांची सुपारी घेऊन काम करणाऱ्यांचे वाटोळे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आयुष्यभर पवारांनी मुंडे यांना विरोध केला. त्याच औलादीच्या पाया पडणारे लोक आज परळीत आहेत. मेहेरबानीने विधानपरिषदेवर जाऊन हे विरोधी पक्षनेते झ्२ााले. पण, नेत्यांना मानायचे, की चमच्याला याचा न्याय जनतेने केला आहे. आज पंकजा मुंडे जिंकल्या आहेत. पंकजाताई तुमचा पक्ष तुमच्या पाठीशी आहे, की नाही माहीत नाही. पण एक भाऊ म्हणून मी मरेपर्यंत तुमच्या पाठीशी राहील, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. धनंजय यांचा त्यांनी थेट ‘धन्या’ म्हणून उल्लेख केला, तर जिल्हाधिकाऱ्यांबाबतही अपशब्द उच्चारत त्यांची बारा तासांत बदली झाली पाहिजे, असे ते म्हणाले. भाषण करताना जानकर यांची दमछाक झाली होती. व्यासपीठावरच त्यांनी तोंडावर पाणी मारत पुन्हा भाषण केले.
गडाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक
च्पावणे एक वाजता पंकजा यांचे हेलिकॉप्टर गडाच्या पायथ्याशी उतरले. तत्पूर्वीच महादेव जानकर, सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले होते. पंकजा यांच्या हेलिकॉप्टरने नेहमीप्रमाणे गडाला दोन फेऱ्या मारल्या. त्या वेळी जमलेल्या जनसमुदायाने जल्लोष केला. त्यानंतर त्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आणलेल्या रथातून गडावर दर्शनासाठी गेल्या. गडाच्या रस्त्यावर व प्रवेशद्वारावर मुंडेसमर्थकांची प्रचंड गर्दी होती.
च्मुंडे गडावर पोचण्यापूर्वी आतील सर्व भाविकांना पोलिसांनी बाहेर काढले. केवळ मुंडे व नेत्यांनाच आत प्रवेश देण्याची भूमिका घेतल्याने समर्थकांनी आक्षेप घेतला. आम्हालाही आत प्रवेश हवा अन्यथा मुंडे यांनी आत न जाता प्रवेशद्वारावरच भाषण करावे, अशी भूमिका समर्थकांनी घेतली. त्यामुळे गोंधळ झाला. अर्धा तास मुंडे व नेते रथातच थांबून होते. अखेर नेत्यांनाच आत सोडण्यात आले. त्यानंतर बाहेर पोलिसांवर चप्पल व दगडफेक झाली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक हे स्वत: यावेळी जमाव नियंत्रित करत होते. दर्शनानंतर नेते गडाच्या खाली मेळाव्यासाठी आले.