शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:19 IST2025-07-14T06:18:47+5:302025-07-14T06:19:04+5:30
पोलिस बनले फिर्यादी; मदत करणाऱ्यांवर होणार कारवाई

शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲपप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ५ यूआरएलधारक (ॲप तयार करणारे) व त्यांना मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता सायबर ठाण्याने रविवारी तपासासाठी पथके नियुक्त केली आहेत.
अहिल्यानगर सायबर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. संकेतस्थळ व ॲप तयार करून देवस्थानची परवानगी न घेता ऑनलाइन पूजा, व्हीआयपी दर्शन, पूजा अभिषेक, तेल चढविणे यासाठी अनियमित दराने शुल्क घेऊन शनिभक्तांची फसवणूक केली. आरोपींनी पुजारी नेमून अवैधरीत्या ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले. यातून शनिभक्त व देवस्थानची फसवणूक झाली. त्यामुळे बनावट ॲप तयार करणारे व त्याचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विश्वस्त मंडळ व इतर दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत शनिभक्त व देवस्थानची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याबाबत विश्वस्त मंडळाला कळविण्यात आले होते. परंतु, देवस्थानसह इतर कुणीही फिर्याद देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे स्वतः पोलिसच फिर्यादी झाले.
‘बनावट ॲप’चा मुद्दा अधिवेशनात गाजला
नेवासाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी बनावट ॲपचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर शनिदेवाच्या नावावर कुणी पैसे कमवत असेल तर त्याला सोडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच त्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणताही आदेश निघालेला नाही.