जळगावात फटाके फोडून रौप्यपदकाचा आनंदोत्सव

By Admin | Updated: August 19, 2016 23:07 IST2016-08-19T23:07:36+5:302016-08-19T23:07:36+5:30

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक मिळविण्यासह भारताला आणखी एक आॅलिम्पिक पदक मिळवून दिल्याबद्दल जळगावात फटाके फोडून व तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा

Carnival of Silver Medal by breaking firecrackers in Jalgaon | जळगावात फटाके फोडून रौप्यपदकाचा आनंदोत्सव

जळगावात फटाके फोडून रौप्यपदकाचा आनंदोत्सव

पी.व्ही.सिंधूचे कौतुक : स्टेडियम समोर व काव्यरत्नावली चौकात जल्लोष
जळगाव : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक मिळविण्यासह भारताला आणखी एक आॅलिम्पिक पदक मिळवून दिल्याबद्दल जळगावात फटाके फोडून व तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जगातील क्रमांक एकची महिला बॅडमिंटन खेळाडू स्पेनची कॅरोलिना मारिन हिला शेवटपर्यंत झुंजविल्याबद्दल सिंधूचे क्रीडा संघटना व शहरवासीयांच्यावतीने विशेष कौतुक केले जात आहे.

सामना पाहण्यासाठी गर्दी
संधूने उपांत्यफेरीत जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. सुवर्णपदकासाठी तिची लढत स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होताच शहरात सर्वत्र क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दुकानांवर, पान टपरींवर टि.व्ही. समोर थांबून अनेकजण समुहाने हा सामना पाहत होते. या सोबतच अनेक घरांमध्येही शहरवासीय हा सामना पाहत असल्याने संध्याकाळपासूनच रस्त्यावर काहीसी वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत होते.

पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्याने आशा उंचावल्या
पहिल्या सेटमध्येच सिंधूने आघाडी घेताच सर्वत्र जल्लोष करण्यात येऊ लागला. त्यानंतर मात्र दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये ती मागे पडली व मारिनने बाजी मारली. यामुळे सुवर्ण पदक हुकले तरी सिंधूने रौप्य पदकावर आपले नाव कोरुन भारताला या आॅलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवून दिल्याबद्दल शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.

घोषणांनी परिसर दणाणला
या वेळी काव्यरत्नावली चौक तसेच जिल्हा क्रीडा संकुलनजीक जैन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी तसेच युवाशक्ती फाउंडेशनच्यावतीने फटाके फोडून तसेच तिरंगा झेंडा फडकावून प्रचंड जल्लोष करण्यात आला. तसेच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी जैन स्पोर्टस्चे फारुक शेख, नरेंद्र चव्हाण, प्रवीण ठाकरे, विवेक अळवणी, समीर शेख, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, राहुल चव्हाण, भूषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, विपीन कावडिया, समीर कावडिया, सागर जगताप, हर्षल भोलाणे, रघुनाथ राठोड, विशाल जोशी आदी उपस्थित होते.
या सोबतच शहरात वेगवेगळ््या ठिकाणी सामना पाहण्यासाठी एकत्र आलेल्यांनीदेखील जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

प्रतिस्पर्धीला शेवटपर्यंत झुंजविले.....
सुवर्ण पदक हुकले असले तरी निराशा नसून तिच्या कामगिरीचे कौतुकच केले पाहिजे, असे फारुक शेख, विवेक अळवणी यांच्यासह क्रीडा प्रेमींनी सांगितले. या बाबत सोशल मीडियावरदेखील सिंधूचे कौतुक केले जात होते.
लंडन २०१२ च्या आॅलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक मिळविले होते. यंदा सिंधूची कामगिरी त्याहून सरस ठरली असून बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून देणारी ती पहिली महिला खेळाडू ठरल्याचाही उल्लेख या वेळी क्रीडाप्रेमींनी केला.

Web Title: Carnival of Silver Medal by breaking firecrackers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.