वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !
By Admin | Updated: June 27, 2017 22:25 IST2017-06-27T22:22:02+5:302017-06-27T22:25:16+5:30
पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही अमर्याद झाली असून, वाहनांच्या धुरातून मोठ्या प्रमाणावर कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन होत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वाहनांच्या धुरातील कार्बनचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संशोधन प्रकल्प तयार केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील सौरभ क्षीरसागर, नागेश कोळी, अमित क्षीरसागर, निखिल होनखांबे व चनबसू कोरे या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून प्रा. एस. के. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे.
वाहनांमधून बाहेर पडणारा धूर एअर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. या धुरातील प्रदुषित हवा आणि धुलीकण काढून घेतले जातात. ती हवा उपकरणाच्या एका विशिष्ट कप्प्यात साठवून ठेवली जाते. त्यानंतर पाणी आणि रसायनांच्या चेंबरमध्ये ती सोडण्यात येते त्यातील कार्बन आणि हवेचे पृथ:करण केले जाते. कार्बन ठेऊन हवा बाहेर सोडली जाते. यामधुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील ७० टक्के कार्बनचे प्रमाण घटते, असे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाव्दारे सिध्द केले आहे. या यशस्वी प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य जे. एम. जाकेटिया, विभागप्रमुख एन. डी. मुढे यांनी अभिनंदन केले आहे.
उपकरणाचा उपयोग असा
चौकांमध्ये सिग्नल चालू असताना वाहनं थांबतात; पण त्यांचे इजिन सुरूच असते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुर सोडला जातो. हे उपकरण जर चौकातील दुभाजकात स्थापित केले तर प्रदुषित हवा ते शोषून घेते आणि ती शुध्द केली जाते. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांच्या चिमणीव्दारे धूर बाहेर पडून प्रदुषण होते; पण चिमणीतील धूर या उपकरणातून सोडला तर धुरातील कार्बनचे प्रमाण कमी होते.