Carbom's tragedy | कारबॉम्बचे कटकारस्थान
कारबॉम्बचे कटकारस्थान

- रवींद्र राऊळ

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील त्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच सटोडियांच्या कोलाहलाने झाली. शेअर खरेदी-विक्री गोंगाटात पार पडत होते. दुपारचा दीड वाजला आणि कानठळ्या बसवणारा आवाज होत स्फोट झाला. काही क्षणांतच सगळीकडे हाडामांसाचा चिखल झाला होता. जखमी लोक इतस्तत: पडले होते. काही गतप्राण झाले होते. बीएसईबाहेरच्या गाड्यांनी पेट घेतला. शेअर बाजार बंद पडला. हा स्फोट इतका भयानक होता की बीएसईच्या काचा दूरवरच्या युनियन बँकेच्या टायपिस्टच्या शरीरात शिरून तो रक्तबंबाळ झाला.
त्यानंतरच्या दोन तास दहा मिनिटांत म्हणजे दुपारी ३.४0 वाजेपर्यंत एअर इंडिया बिल्डिंग, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, काथा बाजार, मशीद बंदर, शिवसेना भवनजवळील इमारत, वरळी सेन्चुरी बाजार, हॉटेल सी रॉक, हॉटेल एअरपोर्ट सेंटॉर, जुहू सेंटॉर या ठिकाणी लागोपाठ बॉम्बस्फोट होत गेले. या कारबॉम्बमध्ये शक्तिशाली आरडीएक्स या स्फोटकाचा वापर करण्यात आल्याने प्रचंड आवाजाचे स्फोट होत हानी झाली. आरडीएक्सच्या स्फोटाने प्रचंड ऊर्जा निर्माण होत असल्याने त्या परिसरातील नागरिक होरपळून मृत्युमुखी पडले. सारं काही चित्रपटातील दृश्यं शोभावित असं घडलं होतं. जीव मुठीत घेऊन धावणारे नागरिक, रडारड, आक्रोश. सायरन वाजवत जाणाºया पोलिसांच्या गाड्या, अग्निशामक बंब. जखमींना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावणाºया अ‍ॅम्ब्युलन्स, टॅक्सी. भेदरलेले पोलीस. आप्तेष्टांचा शोध घेणारी माणसं. टेलिफोन बूथसमोरील रांगा असंच दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत होतं.
अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली आणि मुंबईत जातीय दंगल उसळली. पोलिसांचं नियंत्रण सुटून मुंबई पूर्णपणे दंगलखोरांच्या ताब्यात गेल्याने अखेरीस लष्कराला पाचारण करावं लागलं. दंगल शमते न शमते तोच दोन महिन्यांनी या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई न भुतो न भविष्यती, अशी हादरवून टाकली आणि सारं शहर ठप्प झालं.
या बॉम्बस्फोटांची कुणकुण कोणत्याच गुप्तचर यंत्रणेला लागली नव्हती. आयबी आणि रॉ सपशेल अपयशी ठरल्या होत्या. यामागे कुणाचा हात असावा हे कुणालाच कळत नव्हतं. पहिला संशय एलटीटीई या दहशतवादी संघटनेवर घेतला गेला. मात्र एलटीटीईचा पॅरिस येथील प्रवक्ता लॉरेन्स तिलाकर याने लागलीच याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, अशा शब्दात इन्कार केला. आपल्या गुप्तचर संघटनांनी इतर देशांच्या गुप्तचर संघटनांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते या बॉम्बहल्ल्यांमागे पाकचा हात असल्याचा आरोप करीत यामागील ब्रेन इस्लामाबादेत असल्याचं सांगितलं. त्यांच्या वक्तव्याकडे कुणी लक्ष देत नसतानाच मुंबई पोलिसांच्या हाती काही तासांतच क्ल्यू आला.
बॉम्बस्फोट झाले त्या रात्री वरळी येथील सिमेन्स कंपनीजवळ एक बेवारस कार पोलिसांना आढळली. त्यात एके-५६ रायफली आणि शस्त्रसाठा होता. त्या कारच्या मालकाचा शोध घेत पोलीस माहीमच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये पोहोचले आणि सारा उलगडा झाला. इक्बाल टायगर मेमन आणि त्याचे कुटुंबीय बॉम्बस्फोट होण्याआधीच दुबईला परागंदा झाले होते. बॉम्बस्फोटांचं गूढ हळहळू उकलू लागलं. दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी श्वानपथकांच्या साहाय्याने पार्क केलेल्या स्कूटरमधील बॉम्ब निकामी करण्यात येत होते.
दुबईत मुक्काम ठोकून असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने त्याचा साथीदार तस्कर टायगर मेमन याच्यामार्फत हे स्फोट घडवले होते. मुंबईपासून दुबई आणि पाकिस्तानातील इस्लामाबादपर्यंत धागेदोरे पसरलेल्या या आंतरराष्ट्रीय कटाची व्याप्ती फार मोठी होती. १५ जानेवारी ते १२ मार्च या कालावधीत कट रचून त्याची अंमलबजावणीही झाली होती. यादरम्यान दाऊदने आपल्या विश्वासू साथीदारांची दुबईत बैठक घेत कटाची आखणी केली. मुंबईतील तरुणांच्या दोन तुकड्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं. तस्करीच्या मार्गाने चार हजार किलोवर आरडीएक्स आणि एके-५६, पिस्तुलं, हॅन्डग्रेनेड, जिलेटीन, पेन्सिल टायमर, डिटोनेटर्स असा साठा स्पीडबोटने रायगडमधील शेखाडी, श्रीवर्धन येथे उतरवून मुंबईत आणला.
गुल महंमद या आरोपीच्या जबानीनुसार तो चार तरुणांसोबत आठवडाभरासाठी इस्लामाबाद येथे गेला होता. विमानतळावरून त्यांना एका जंगलात निर्जन ठिकाणी असलेल्या ट्रेनिंग कॅम्पवर नेण्यात आलं. तेथे एके-५६ रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. तेथून त्यांना दुबईला पाठवून मग मुंबईत रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे पाकिस्तानात जाताना आणि बाहेर पडताना कोणत्याही इमिग्रेशन सोपस्काराला सामोरं जावं लागलं नाही. त्या २0 प्रशिक्षणार्थींपैकी फक्त दोघेच पोलिसांच्या हाती लागू शकले. शरीफ परकार याने संदेरीच्या जंगलात दहा स्थानिक तरुणांना शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यापैकी निम्मे तरुण मुंबईच्या दंगलीची झळ बसलेले होते.
त्यानंतर आरडीएक्स, शस्त्रसाठा समुद्रमार्गे कोकणच्या किनाºयावर उतरवणं, तरुणांना गोळीबाराचं प्रशिक्षण, स्फोटांसाठी कार आणि स्कूटरची मोठ्या प्रमाणावर खरेदी, प्रत्येकी ४0 किलो आरडीएक्स भरून कारबॉम्बची पेरणी आणि मुख्य आरोपींचं दुबईला पलायन असा घटनाक्रम घडूनही गुप्तचर यंत्रणांना ताकास तूर लागला नव्हता. कमालीची गोपनीयता बाळगण्यात आरोपी यशस्वी झाले होते. तीन देशांमधील ठिकाणं या घातपाताच्या कटाची केंद्रं होती. पण शेकडो आरोपी यात गुंतलेले असूनही अखेरपर्यंत हा कट उघडकीस आला नाही. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्या. बॉम्बस्फोटानंतर बारा दिवसांनी मुंबई पोलिसांचं तत्कालीन अतिरेकीविरोधी पथक तडकाफडकी बरखास्त करण्यात आलं.
गेल्या २५ वर्षांत आयएसआय या पाक हेर संघटनेने इंडियन मुजाहिद्दीन, जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा अशा वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांना हाताशी धरून भारतात अनेक घातपात घडवून आणले. त्यात मुंबई लोकलमधील साखळी स्फोटांचाही समावेश आहे. १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका ही या घातपातपर्वाची सुरुवात होती.
या बॉम्बस्फोट मालिकेने केवळ जीवित आणि वित्तहानीच केली नाही तर पुढच्या तपासात भारतीय प्रशासन कसं भ्रष्टाचाराने पोखरलेलं आहे हेही उघडकीस आणलं. लाच देऊन येथे देशद्रोही कारवाया केल्या तरी त्याकडे आपली यंत्रणा सोयीस्कररीत्या डोळेझाक करते, हेच पुढे सिद्ध झालं. तस्करीचा माल आणणाºया स्पीडबोटी कोकण समुद्रकिनाºयावर लागत. त्यातील मालाचं लॅन्डिंग होऊन तो देशभर नेला जाई. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी कस्टम अधिकारी लाखो रुपये घेत. बॉम्बस्फोटांसाठी आणलेले आरडीएक्स आणि शस्त्रसाठा सुरळीतपणे मुंबईत टायगर मेमनच्या इमारतीत आणण्यासाठी आरोपींनी कस्टम अधिकाºयांना असेच लाखो रुपये वाटले. त्यात अ‍ॅडिशनल कस्टम कलेक्टर एस.एन. थापा यांच्यासह अनेक बड्या कस्टम अधिकाºयांचा समावेश होता. एका पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारीही याच आरोपाखाली गजाआड झाले. खुद्द टायगर मेमनचा भाऊ दंगलीच्या काळात पोलिसांच्या शांतता समितीचा सदस्य होता. त्याचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संबंध होते.
बॉम्बस्फोटानंतर खडबडून जाग आलेल्या तपास यंत्रणांनी मग दाऊदचं साम्राज्य चालवणाºया साथीदारांची यादी तयार कर, पाकिस्तानला सतत वाºया करणाºयांचा शोध घे, अशी कारवाई करीत अनेक आरोपींना गजाआड केलं. १९८५ साली दाऊद इब्राहिमने मुंबई सोडून दुबई गाठली तरी बॉम्बस्फोट होईपर्यंतच्या आठ वर्षांच्या काळात मुंबईतील त्याच्या कारवाया बिनदिक्कत सुरूच होत्या. वेळीच त्याचं अंडरवर्ल्डमधील साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात आलं असतं तर कदाचित बॉम्बस्फोटांचा कट अमलात आणण्यासाठीचं नेटवर्क त्याला उभं करता आलं नसतं, असं म्हटलं जातं. एकूणच गुप्तवार्ता आणि प्रतिबंधात्मक कारवाई या पातळीवर आपण अपयशी ठरल्याची खंत तत्कालीन अधिकारी कबूल करतात. बॉम्बस्फोटांचं हे शल्य प्रत्येक मुंबईकराच्या मनात कायम सलत राहील.

Web Title: Carbom's tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.