मराठीचा कॅनव्हास मोठा झाला पाहिजे

By Admin | Updated: February 1, 2015 01:05 IST2015-02-01T01:05:32+5:302015-02-01T01:05:32+5:30

निर्मात्यांनाही आपला चित्रपट मराठीबरोबर प्रदर्शित करताना एक प्रकारची भीती वाटेल, त्याचीच ‘बाजी’ हा चित्रपट ठिणगी असेल, असा विश्वास अभिनेते जितेंद्र जोशी याने व्यक्त केला.

The canvas of Marathi should be bigger | मराठीचा कॅनव्हास मोठा झाला पाहिजे

मराठीचा कॅनव्हास मोठा झाला पाहिजे

पुणे : मराठी चित्रपटाचा ‘कॅनव्हास’ हा मोठा झालाच पाहिजे. हिंदी चित्रपटसृष्टीतही तो आपला दबदबा निर्माण करू शकेल, निर्मात्यांनाही आपला चित्रपट मराठीबरोबर प्रदर्शित करताना एक प्रकारची भीती वाटेल, त्याचीच ‘बाजी’ हा चित्रपट ठिणगी असेल, असा विश्वास अभिनेते जितेंद्र जोशी याने व्यक्त केला.
मराठीमध्ये प्रथमच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीस तोड असलेला ‘बाजी’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी चित्रपटात खलनायकी रंग दाखविणारा जितेंद्र आणि सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणारा श्रेयस तळपदे यांच्यासह निर्माते अमित अहिरराव यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला़ या वेळी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी स्वागत केले़
^‘थ्री चिअर्स’ नाटकानंतर तब्बल १५ वर्षांनी श्रेयस आणि जितेंद्र ही जोडी आणि ‘इक्बाल’नंतर ७ वर्षांनी अभिनेता म्हणून श्रेयस, असा योग ‘बाजी’च्या माध्यमातून पुन्हा जुळून आला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल दोघांच्याही मनात एक वेगळे स्थान असल्याचे त्यांच्या संवादातून जाणवले. दोघेही केवळ चित्रपटाबद्दलच नव्हे; तर एकमेकांबद्दल खूपच भरभरून बोलत होते. जितेंद्र म्हणाला, ‘‘श्रेयस हा कमी बोलणारा आणि मी बोलघेवडा. त्यातच आमचा जन्मदिवस आणि रासही एकच. त्यामुळे आमचे ट्यूनिंग खूप छान जुळले़’’ त्यावर श्रेयसनेही नाटकामध्ये जितेंद्रची छोटी भूमिका असूनही त्याची कामाविषयीची समर्पित वृत्ती, प्रामाणिकपणा, अफाट ऊर्जा या गुणांचे मनापासून कौतुक केले. ‘बाजी’मध्ये त्याने जो ‘मार्तंड’ साकारला आहे, त्याच्याशिवाय तो कुणीच करू शकले नसते, असे सांगून व्हॅनिटीमध्ये बसलेले असताना तुम्हाला कुणीतरी भेटायला आले असल्याचे सांगितले़ मी पाहिले तर एक टकला, मिशी काढलेला माणूस समोर दिसला आणि मी ‘जित्या तू’ असे म्हणून ओरडलोच. त्या भूमिकेत तो मनापासून शिरला होता, अशी आठवण श्रेयसने सांगितली. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या दर्जाचा हा चित्रपट झाला असून, प्रदर्शनापूर्वीच टे्रलरमुळे ‘बाजी’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य अ‍ॅक्शन मास्टरांकडूनच हे सीन साकारण्यात आल्याने आमची पूर्णत: वाट लागली असल्याचे जितेंद्र मिस्कीलपणे म्हणाला. या वेळी ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्ूटचे संस्थापक विजय शेंडकर, जनरल प्रँक्टिशनर असोसिएशनचे (जीपीए)चे अध्यक्ष डॉ. संताजी कदम उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

अनेक दुखापतींचा
सामना करावा लागला
४श्रेयस म्हणाला, ‘‘या चित्रपटासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी खूप करावी लागली. ‘इक्बाल’मध्ये नागेश कुकुनूर याने अभिनयाच्या साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढले होते. ‘बाजी’मध्ये निखिल महाजनने तेच केले. म्हणूनच घोडेस्वारी येत नसूनही, ती करण्याचा विश्वास, श्वास रोखून धरणारे अ‍ॅक्शन सीन करायला बळ मिळाले. ते सीन करताना अनेक दुखापतींचा सामना करावा लागला; पण आशा सोडली नाही, असे श्रेयसने सांगताच जितेंद्रनेही त्याला दुजोरा देत मरणाच्या दारातून तो परत आल्याचे सांगितले.

‘बाजी’ चित्रपटाचे बजेट हे ६ कोटींच्या आसपास आहे. मात्र, हा चित्रपट ज्या पद्धतीने साकार झाला आहे, ते पाहून हे बजेट कमी आहे की काय, असे वाटते. ते वाढवू शकलो नाही, याची आता खंत वाटते.
- अमित अहिरराव, निर्माता

या चित्रपटासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी खूप करावी लागली. मात्र अ‍ॅक्शन सीन करायला आम्हाला बळ मिळाले. या चित्रपटामुळे मराठी चित्रपटाच्या व्यावसायिकतेचीही समीकरणे बदलतील. त्याचप्रमाणे हा चित्रपट रसिकांनाही खूप आवडेल.
- श्रेयस तळपदे, अभिनेता.

 

Web Title: The canvas of Marathi should be bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.