१० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

By अमित महाबळ | Updated: August 30, 2023 19:09 IST2023-08-30T19:09:23+5:302023-08-30T19:09:44+5:30

पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे

Candidates who pass 10th, 12th re-examination will get admission to Diploma | १० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

१० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील प्रथम वर्ष पदविका, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. 

पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. त्यांना संस्थास्तरावर होणार असलेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर तयार केली जाणार आहे. संस्थेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागणार आहे.   

या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू

१० वी नंतरचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका आणि १२ वी नंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्था पातळीवरील जागांसाठी नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चित करणे ही प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ डेट) म्हणजेच दि. ८ सप्टेंबरपर्यंत आणि १२ वीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांसाठी दि. २० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.  

प्राचार्य म्हणतात...
दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. हे प्रवेश नॉन कॅप अंतर्गत होणार असून, खासगी व शासकीय महाविद्यालयात संस्था पातळीवरील कौन्सिलिंग फेरीत विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. मात्र, त्यांना शासनाच्या आर्थिक सवलती देय नसतील, अशी माहिती जळगावचे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पराग पाटील यांनी दिली.

Web Title: Candidates who pass 10th, 12th re-examination will get admission to Diploma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ssc examदहावी