मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा
By बापू सोळुंके | Updated: June 21, 2024 22:11 IST2024-06-21T22:11:00+5:302024-06-21T22:11:37+5:30
मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले.

मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या ५६ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते करीत आहेत. येवल्यावाल्यांचे (मंत्री छगन भुजबळ) ऐकून जर एकही कुणबी नोंद रद्द केली तर महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी रात्री येथे राज्यसरकारला दिला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे यांनी शुक्रवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या ५६ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामुळे कायदेशीररित्या नोंदी सापडलेले मराठा बांधव ओबीसीच आहेत. आता हैदराबाद स्टेट, सातारा स्टेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. आणि हे आरक्षण आपण घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे जरांगे म्हणाले.
जरांगे यांचे आंदोलन सरकार चालवत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्यासाठी सारखेच आहे. केवळ कोट्यवधी मराठा समाज आज माझ्या पाठिशी उभा आहे, म्हणूनच आपला लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी नेते केवळ मराठा आंदोलनाची बरोबरी करण्यासाठी वडीगोद्री येथे आंदोलन सुरू केल्याचा आरोप करीत जरांगे यांनी केला. आंदोलन कसे कणखर पाहिजे. मात्र आमच्या आंदोलनस्थळी चार मंत्री आले होते तर त्यांच्याकडेही चार मंत्रीच आले पाहिजे असा आग्रह ते धरत आहेत. आम्ही जेथे आंदोलन केले तेथेच ते आंदाेलन करून काय दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले.