अपघात टाळण्यासाठी बसचालकांवर ‘वॉच’; किती तास बस चालवली हे समजणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:04 IST2024-01-10T14:04:25+5:302024-01-10T14:04:59+5:30
बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण; लवकरच संकेतस्थळ

अपघात टाळण्यासाठी बसचालकांवर ‘वॉच’; किती तास बस चालवली हे समजणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः खासगी बस अपघातात एकावेळी अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण आहे. अनेक चालक जास्त वेळ काम करतात, त्यामुळे त्यांना थकवा येऊन डुलकी लागते त्यातून अपघात होतो. पण आता बसचालकाच्या कामावर आरटीओची नजर असणार आहे.
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बसचालकांना रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. त्यामध्ये अपघात होतात. चालकांना थकवा आला असेल तर विश्रांती घ्यावी, पण तसे न करता ते बस चालवतात. तसेच रात्री बसचालकांनी दर दोन तासांनी दोन ते पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. थकवा येऊनही गाडी चालविल्यास अपघाताचा धोका असतो. रात्री १२ ते पहाटे दरम्यान ५ गाडी चालवताना एक अतिरिक्त चालक असायला हवा, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जास्त वेळ बस चालवून थकल्याने काही अपघात घडत आहेत. चालकाने किती तास काम केले, यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. त्यावर चालकांना वाहन चालवण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. त्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल.
- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त