संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:37 IST2017-11-14T02:37:02+5:302017-11-14T02:37:17+5:30
एसटी संपात सहभागी झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांचे नाव, पद आणि पत्रव्यवहाराचा पत्ता मागवा, असे परिपत्रक महामंडळाने काढले आहे.

संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम
मुंबई : एसटी संपात सहभागी झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांचे नाव, पद आणि पत्रव्यवहाराचा पत्ता मागवा, असे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. हे परिपत्रक तातडीचे म्हणून समजण्यात यावे, असेदेखील महामंडळाने म्हटले आहे. या परिपत्रकामुळे सुमारे १० हजार कर्मचाºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता जनसंपर्क विभागाने संबंधित अधिकाºयांकडून खात्री करून या विषयावर बोलू असे सांगितले.
महामंडळात अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांची संख्या १० हजारांच्या घरात आहे. संपकालीन अनुपस्थित राहिलेल्या अनुकंपा कर्मचाºयांचीदेखील माहिती मागवण्यात आली आहे. परिवहन विभागाची प्रादेशिक कार्यालये, कार्यशाळा आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना ९ नोव्हेंबरला हे परिपत्रक पाठवण्यात आले. कामगारांचा वेतन करार संपून दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. परिणामी, कामगारांनी उत्स्फूर्तपणे संपात सहभाग घेतला.
सद्य:स्थितीत ‘वेतनवाढीसाठी पुकारलेला संप’ हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, महामंडळाकडून अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांचे नाव, पत्ते मागवल्यामुळे कर्मचाºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळात वेतनवाढ झालेली नसताना कर्मचाºयांच्या चार दिवसांच्या वेतन कपातीस सुरुवात झाली. नोव्हेंबरपासून पुढील एकूण चार महिन्यांच्या वेतनातून एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. वेतन कपात रद्द करण्यासाठी आठ दिवसांची रजा जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. तथापि, अनुकंपा कर्मचाºयांवरदेखील कारवाई होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. त्यामुळे एसटी कर्मचाºयांची अवस्था ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी बनली आहे.
वेतनवाढीसाठी १७ ते २० आॅक्टोबरदरम्यान ‘एसटी’ कर्मचाºयांनी संप पुकारला. राज्यातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या संपाला अधिकारी वर्गातूनही छुपा पाठिंबा होता.
असे परिपत्रक अतार्किक-
वास्तविक पाहता अशा कर्मचाºयांची माहिती मागवून प्रशासनाकडून कर्मचाºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. वेतनप्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यामुळे वेतनवाढीबाबत कामगारांमधील नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे परिपत्रक प्रसारित करणे अतार्किक आहे.
- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.