सुरांच्या मैफिलीत बेसुरांची घुसखोरी
By Admin | Updated: September 17, 2014 00:59 IST2014-09-17T00:59:04+5:302014-09-17T00:59:04+5:30
नागपुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या सांगितिक मैफिलीतील हा किस्सा आहे. एका संस्थेने गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. आयोजक प्रायोजकांसाठी फिरत असताना एक बडे व्यावसायिक त्यांना म्हणाले,

सुरांच्या मैफिलीत बेसुरांची घुसखोरी
रसिकांना मनस्ताप : प्रायोजकच झाले गायक
नागपूर : नागपुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या सांगितिक मैफिलीतील हा किस्सा आहे. एका संस्थेने गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. आयोजक प्रायोजकांसाठी फिरत असताना एक बडे व्यावसायिक त्यांना म्हणाले, ‘मी या कार्यक्रमाला प्रायोजक मिळवून देतो पण एक अट राहील. तुम्ही आमच्या कुटुंबातील एका सदस्याला गाण्याची संधी दिली पाहिजे’. आयोजकही त्यावेळी तेवढेच हतबल होते. त्यांना ही अट मान्य करावी लागली. कार्यक्रम पार पडला परंतु रसिकांवर लादलेली ती ‘प्रायोजित’ बेसूर गीते अजूनही पिच्छा सोडायला तयार नाही. अलीकडच्या काळात नागपुरात स्वरांच्या मैफिलीत अशा बेसुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. पूर्वी राजकारणात निवडणुकीसाठी फायनान्सर अर्थसाहाय्य करायचे. पुढे तेच निवडणुकीच्या रणांगणात उतरले. संगीताच्या क्षेत्रातही आता असेच होऊ लागले आहे. साधनेचे आणि प्रतिभावंतांचे हे क्षेत्र या घुसखोरीमुळे बदनाम होऊ लागले आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने मागील दोन महिन्यात नागपुरात झालेल्या सांगितिक मैफिलींचे (नि:शुल्क आणि सशुल्क) लोकमत चमूने सर्वेक्षण केले. यात कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्यात. गुणवत्ता हरवीत चाललेल्या गीतांच्या कार्यक्रमांना रसिकही कंटाळले असल्याचे धक्कादायक निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आले आहेत. कलावंतांनी सातत्याने साधना करीत राहायला हवे आणि गीतांच्या सादरीकरणातला आनंद रसिकांपर्यंत पोहोचायला हवा. यातला पुन:प्रत्यय तर रसिकांच्या वाट्याला अभावानेच येतो पण स्वरांच्या मैफिलीत बेसुरांच्या घुसखोरीने मात्र रसिकांच्या आनंदावर विरजण लागले असल्याची संतप्त प्रतिक्रिया या रसिकांनी व्यक्त केली.
‘लोकमत’ची भूमिका
संगीताच्या क्षेत्रात नागपूरला दीर्घ परंपरा आहे. या शहराने अनेक प्रथितयश कलावंत दिले. नागपुरात दररोज कुठल्याना कुठल्या भागात संगीताचे कार्यक्रम होतात. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. पण अलीकडच्या काळात स्वत:ची हौस भागवण्यासाठी काही मंडळी अशा जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. खासगी, कौटुंबिक मैफलींपर्यंत हे प्रमाण ठीक आहे. पण तिकीट लावून, मोठ्या सभागृहांत अशा कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि गायनाशी सूतराम संबंध नसलेल्यांनी हातात माईक घेऊन रसिकांना छळायचे, हा कुठला प्रकार? कलेच्या क्षेत्रावर कुठल्याही जातीची, धर्माची, भाषेची मक्तेदारी असू शकत नाही आणि गाणारा गळा पैशाने विकतही घेता येत नाही. केवळ प्रतिभा आणि साधना हे दोनच निकष त्यात असतात. ते प्रत्येकाच्याच वाट्याला येत नसते. त्यामुळे संगीताच्या क्षेत्रात असलेल्या कलावंतांनी त्याकडे केवळ धंदा म्हणून पाहू नये आणि त्यातील गांभीर्य संपवू नये, एवढाच ‘लोकमत’चा हेतू आहे.
प्रायोजकच झाले गायक
गाणे सादर करण्यासाठी साधना आणि परिश्रमाची गरज असते. शास्त्रीय संगीत शिकलेले नसले तरीही सुगम गीत सादर करता येऊ शकते पण त्यासाठी प्रतिभावंत गायक लागतो. गीताचा आशय, अर्थ समजून गाण्याचा आणि त्यासाठी परिश्रमाची तयारी असणारा गायक असला तर शास्त्रीय संगीत न शिकलेला गायकही उत्तम गीत सादर करू शकतो. पण नागपुरात मात्र सध्या आनंदीआनंद आहे. एखादा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रायोजक लागतात. पण प्रायोजकच आपल्या नातेवाईकांना कार्यक्रमात गाण्याची संधी मागतात अन्यथा प्रायोजकत्व नाकारतात. त्यामुळे आयोजकांचीही पंचाईत होते. प्रायोजकांच्या हट्टामुळे त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली जाते पण त्यांच्या गाण्यात मात्र दम नसतो. प्रत्येकाने आपले योगदान आपापल्या क्षेत्रात द्यायला हवे. पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रायोजकच थेट गीत सादर करीत असल्याने कार्यक्रमांचा आणि रसिकांच्या आनंदाचा विचकाच होतो. (लोकमत चमू)