‘बिझनेस आयकॉन्स’ विकासाचे सारथी
By Admin | Updated: December 22, 2014 03:02 IST2014-12-22T03:02:06+5:302014-12-22T03:02:06+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण

‘बिझनेस आयकॉन्स’ विकासाचे सारथी
नागपूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या नागपुरातील खऱ्या ‘आयकॉन्स’चा शोध घेऊन त्यांच्या यशाची गाथा ‘लोकमत’ने जगासमोर आणली. ही वृत्तपत्र क्षेत्रातील क्रांतिकारक घटना आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व ‘जेएसडब्ल्यू ग्रुप’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांनी काढले.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी एका शानदार समारंभात नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे झालेल्या या कार्यक्रमात सज्जन जिंदल यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरकरांना अभिमान वाटावा अशी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ५४ ‘बिझनेस आयकॉन्स’च्या उत्तुंग यशाची गाथा या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा होते.
समारंभाच्या सुरुवातीला ‘लोकमत’ समूहाच्या वाटचालीविषयीचा लघुपट सादर करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. यानंतर गडकरी व जिंदल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. देशातील प्रत्येक शहरात असा उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत जिंदल यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या शानदार समारंभाची सांगता झाली. लोकमत नागपूरचे युनिट हेड नीलेशसिंह यांनी मान्यवरांचे स्वागत केले. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र हेदेखील मंचावर उपस्थित होते. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)