मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील घरफोड्या करून नागरिकांची कष्टाची कमाई पळवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी रणनीती आखून संशयितांना अटक केली. त्यामुळे नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मागील काही दिवसांपासून ते सतत भितीच्या सावटाखाली वावरत होते.
आरोपी भाड्याने राहत असून दरोड्यादरम्यान दुसऱ्या शहरातून जाण्याचा मार्ग निवडायचे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात होते. तपासादरम्यान, या टोळीच्या म्होरक्याचा भाऊ येरवडा तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने पोलिसांनी टोळीच्या कौटुंबिक संबंधांबद्दल अधिक तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी साबे गावातील एका चाळीत भाड्याने राहत असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी सापळा रचला
पोलिसांनी टँकरमधून पाणी पोहोचवून अतिरिक्त माहिती गोळा करण्याची रणनीती आखली आणि टोळीचा विश्वास संपादन केला. शेवटी, २५-३० अधिकाऱ्यांच्या गटाने चाळीला वेढा घातला आणि संशयितांना अटक केली. शहाजी पवार आणि अंकुश पवार, अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.