गिरगावात इमारतीचा भाग कोसळला
By Admin | Updated: August 5, 2016 05:29 IST2016-08-05T05:29:29+5:302016-08-05T05:29:29+5:30
गिरगाव येथील भगीरथी या इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला.

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला
मुंबई : गिरगाव येथील भगीरथी या इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी या इमारतीमध्ये अडकलेल्या चार महिलांना सुखरूप बाहेर काढले असून, या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
गिरगावमधील दुसरी खत्तर गल्ली या परिसरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जैन कुटुंबिय राहत आहेत. तळमजल्यावर गोदाम असून पहिला मजला रिकामा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जैन कुटुंबातील नऊजण राहतात. याच कुटुंबातील नेहा जैनने (२२) ‘लोकमत’ला दिलेल्या महितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांतच ते हे घर रिकामे करण्यात येणार होते. पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री नेहाची आई, तिची काकू आणि लहान बहीण घरी होती. तर वडील, काका आणि दोन भाऊ घराबाहेर होते. रात्री आठच्या सुमारास नेहा कामावरून घरी आल्यानंतर ती जेवायला बसली असता मोठा आवाज झाला. किचनचा सर्व भाग कोसळला होता. रहिवाशांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. (प्रतिनिधी)