रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: August 17, 2016 20:02 IST2016-08-17T20:02:41+5:302016-08-17T20:02:41+5:30

तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला.

Brother's accidental death on the eve of Rakshabandhan | रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

ऑनलाइन लोकमत
उमरखेड, दि. 17 - तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला. या तिघींचा लाडका भाऊराया अपघातात काळाने हिरावून नेला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने तालुक्यातील देवसरी येथे शोककळा पसरली.
पुंजाराम रामराव देवसरकर (४०) रा. देवसरी असे मृताचे नाव आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेला पुंजाराम रक्षाबंधनाला बहिणी घरी येणार असल्याने उत्साहात होता. बुधवारी तो काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने उमरखेडला जात होता. त्यावेळी साखरा गावाजवळील पुलावर त्याची दुचाकी स्लीप झाली. तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला.
ही वार्ता देवसरी येथे पसरताच सर्वांना धक्का बसला. पुंजारामला राखी बांधण्यासाठी त्याच्या पद्मावती, रेणुका आणि वनिता या तीन बहिणी गुरुवारी येणार होत्या. परंतु भावाला राखी बांधण्याऐवजी त्याच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. बुधवारी भावाचे कलेवर पाहून या तीन बहिणींचा आक्रोश गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत होता. या अपघाताची दखल पोलिसांनी घेतली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

Web Title: Brother's accidental death on the eve of Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.