लाचखोर पोलीस शिपाई अटक * ५८ हजार उकळले : परराज्यातील वाहन पकडून कारवाईचा बहाणा
By Admin | Updated: May 17, 2014 21:43 IST2014-05-17T19:52:17+5:302014-05-17T21:43:34+5:30
नियमभंग केल्याची कारणे देत मोटार मालकाकडून ५५ हजार ५०० रुपये उकळणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.

लाचखोर पोलीस शिपाई अटक * ५८ हजार उकळले : परराज्यातील वाहन पकडून कारवाईचा बहाणा
पुणे : हरियाणा पासिंग असलेली मोटार पकडून विविध नियमभंग केल्याची कारणे देत मोटार मालकाकडून ५५ हजार ५०० रुपये उकळणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. महाराष्ट्र शासनाचा कर न भरल्याच्या कारणावरुन वाहन सोडविण्यासाठी ३ हजार ५०० रुपये आणि टॅक्सच्या नावाखाली त्याने ८ सप्टेंबर २०१३ रोजी ५५ हजार रुपये त्याने घेतले होते.
शरद दिलीप थोरात (वय २८, रा. तुकाईदर्शन, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील एका व्यक्तीने लाचलुचपतकडे थोरात याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. हरियाणा पासिंगची मोटार क्र. एचआर. २६, एवाय. ४६२६ घेऊन ते कोरेगाव पार्क भागातून जात होते. कोरेगाव पार्क वाहतूक विभागामध्ये नेमणूकीस असलेला पोलीस शिपाई थोरात याने ही मोटार पकडली.
मोटारीचा महाराष्ट्रातील कर भरलेला आहे का अशी विचारणा त्यांच्याकडे थोरात याने केली. हा कर भरलेला नसल्यामुळे थोरात याने मोटार कारवाई न करता सोडण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व्यक्तीकडून ही रक्कम स्विकारल्यानंतर मोटारीचा कर भरण्याच्या नावाखाली ५५ हजार रुपये घेतले होते. आपल्या पदाचा गैरवापर करुन तसेच शासनाचे आर्थिक नुकसान केले. याची तक्रार लाचलुचपत कडे आल्यावर चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३ (१)ड सह १३ (२) प्रमाणे मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.