प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 09:06 IST2022-06-10T09:05:37+5:302022-06-10T09:06:13+5:30
High Court : बुलडाणा जिल्ह्यातील विवाहित जीवनचे पीडित मनीषासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावेळी मनीषा अविवाहित होती. जीवनचे पत्नीसोबत भांडण सुरू होते.

प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- राकेश घानोडे
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले म्हणून तिच्याविरुद्ध प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे या निर्णयात स्पष्ट केले.
बुलडाणा जिल्ह्यातील विवाहित जीवनचे पीडित मनीषासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावेळी मनीषा अविवाहित होती. जीवनचे पत्नीसोबत भांडण सुरू होते. त्याचा घटस्फोट झाला नसल्याने तो मनीषासोबत लग्न करण्यास असमर्थ होता. मनीषाने त्याचे मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला; पण तो पुढे गेला नाही. परिणामी, मनीषाने जीवनसोबतचे संबंध तोडले.
...तर मनीषावर अन्याय
वादग्रस्त एफआयआर कायम ठेवल्यास मनीषावर अन्याय होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जीवन पत्नीसोबतच्या भांडणामुळे आधीच मानसिक तणावात होता. मनीषाने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही, असा जीवनच्या आईचा आरोप होता. न्यायालयाने यासाठी मनीषाला दोष दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. मनीषा लग्न करण्यास तयार होती. जीवनने तिला सहकार्य केले नाही. जीवनने आत्महत्या करावी, अशी कोणतीही प्रत्यक्ष कृती मनीषाने केली नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.