दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान

By Admin | Updated: June 9, 2016 06:20 IST2016-06-09T06:20:38+5:302016-06-09T06:20:38+5:30

घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे

By breaking the dark of poverty, he reached the top of the achievement | दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान

दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान


ठाणे : घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे. मिळाले, तर कधी दोन दिवस तर कधी दोन महिने बिगारी काम. पावसाळ््याच्या दिवसांत तर काम नसल्याने घरात नियमित चूल पेटेल तर शप्पथ. घराचे भाडे भरायलाही कधी कधी पैसेही नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि शिकण्याची आवड या जोरावर कळव्यातील जयभीमनगर येथील झोपडीत राहणाऱ्या गोविंदा राठोड या मुलाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के मिळवून यशाचे शिखर गाठले. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणाऱ्या कुटुंबीतील मुलाने मिळवलेले हे गुण पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ््यांत आनंदाश्रू तरळले. त्यांशिवाय त्यांच्याकडेही त्याला देण्याजोगे काही नाही.
दहावीचा निकाल लागताच पास झालेल्या मुलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. पण पेढे सोडाच, घरी गोडधोड करुन आनंद व्यक्त करण्याची सुद्धा ऐपत नसलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांनी फक्त गोड शब्दांतच कौतुक करीत आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला. रोजंदारीवर वेठबिगारी करणाऱ्या गोविंदच्या आई-वडिलांना नाक्या-नाक्यावर उभे राहून रोज काम मिळवावे लागते. कधी १०० तर कधी २०० - २५० रूपये मिळतात. पावसाळा जवळ आल्याने आता दोघांचेही काम गेले आहे. काम नसेल तेव्हा कचरा वेचून जेमतेम पैसे जमा होतात. त्यावर त्यांचे घर चालते. पैसे नसतील तर घरी जेवणच बनतेच असेही नाही. त्याचे घरही भाड्याचे. वीज-पाण्याचे मिळून महिना दीड हजार रुपये त्यांना द्यावे लागतात. कधी कधी भाडे नाही दिले, तर मालक घराबाहेर हाकलतात. पावसाळ््यात तर वीजही नसते. जेव्हा काळाशार अंधार घर व्यापून उरलेला असतो, तेव्हा मिणमिणत्या दिव्यात गोविंदा अभ्यास करत असे. पावसाळ््यात घराचे छप्पर गळते. त्यामुळे रात्रभर झोपही सोडून घरच्यांसोबत तो पाणी उपसत बसायचा. अशा हलाखीच्या परिस्थितीत गोविंदाने दहावीचा अभ्यास केला. शाळेत अनेकदा तो उपाशी जायचा. शाळेत गेल्यावर त्याचे शिक्षक, मुख्याध्यापक त्याला जेवण देत. त्याच्या शैक्षणिक साहित्यांचाही खर्च त्यांनीच केला. गोविंदाचे आई वडिल जरी शिकले नसले तरी मुलासाठी ते मोठ्ठी स्वप्ने पाहताहेत. गोविंदाची आई त्याला अभ्यासाला पहाटे पाच वाजता उठवत असे. आर्थिक अडचणींमुळे पुढचे शिक्षण प्रश्न त्याच्यासमोर आहे. गोविंदाला आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे तो सांगतो. शाळेतर्फेत्याला पुढील आयुष्यात सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले.
>शारदा विद्यामंदिराचा ज्ञानयज्ञ
१९७७ सालापासून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शारदा विद्यामंदिर या शाळेत आश्रमशाळा, झोपडपट्टी राहणारे आणि अत्यंत गरीब कुटुंबातील मुले शिकायला येतात. घरात अठराविश्वे दारिद्रय असल्यामुळे शाळा मुलांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तकापर्यंत सगळे पुरवते.
यामागे सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, हा उदात्त हेतू असल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापक सांगतात. शाळेचासुद्धा कधी नव्हे तो ८७.६९ टक्के निकाल लागल्याने हा दुग्धशर्करा योग असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: By breaking the dark of poverty, he reached the top of the achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.