‘बनवाबनवी’चा गोरखधंदा

By Admin | Updated: January 30, 2015 01:01 IST2015-01-30T01:01:50+5:302015-01-30T01:01:50+5:30

विणकरांची, कुंभारांची, चर्मकार, सुपं-टोपले बनविणारांची, सुतारांची अन् अन्य काही चीजवस्तू बनविणाऱ्यांचीही अनेक गावात वस्ती असते. या वस्तीतील बहुतांश रहिवासी तीच कामं करतात.

The brawl of 'Bachanavai' | ‘बनवाबनवी’चा गोरखधंदा

‘बनवाबनवी’चा गोरखधंदा

अशीही एक वस्ती : आरोपींचा देशभरात अनेकांना गंडा
नरेश डोंगरे : नागपूर
विणकरांची, कुंभारांची, चर्मकार, सुपं-टोपले बनविणारांची, सुतारांची अन् अन्य काही चीजवस्तू बनविणाऱ्यांचीही अनेक गावात वस्ती असते. या वस्तीतील बहुतांश रहिवासी तीच कामं करतात. त्यामुळे ती वस्ती त्याच नावाने गावात ओळखली जाते. मात्र, फसवणूक करणाऱ्यांची कुठे वस्ती असेल काय...? , प्रश्न बुचकळ्यात टाकणारा असला तरी, या प्रश्नाचे उत्तर ‘होय‘ आहे. झारखंडमध्ये जामतारा जिल्ह्यातील एका गावात अशी एक वस्ती आहे, जेथील ३० ते ४० तरुण व्यवसाय म्हणून फसवणुकीचाच गोरखधंदा करतात. नागपूरच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या टोळीचा छडा लावला. टोळीतील आस्तिककुमार मुकेश सिंग (२०, रा. न्यू कॉलनी, जामतारा, झारखंड), रोहित कोकीळ मंडल (१९, रा. रेल्वे कॉलनी, जामतारा) तसेच रामदेव ऊर्फ सिंथॉल कोकीळ मंडल (२०, रा. काशिकांड, झारखंड) या तिघांना अटक केली. चौकशीत पोलिसांसमोर आरोपींनी सांगितलेले किस्से चक्रावून सोडणारे आहेत.
झारखंड-पश्चिम बंगालच्या सीमेवर जामतारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कर्मातांडा नामक गावात एक वस्ती आहे. येथील बहुतांश तरुण शिक्षणानंतर नोकरी अथवा कामधंदा शोधत बसत नाही. त्याऐवजी ते ‘बनवाबनवीचा उद्योग‘ सुरू करतात. सायंकाळी गावातून वेगवेगळ्या नावावर पाच-सात सीमकार्ड खरेदी करतात. सकाळी आंघोळ झाली की ते या सीमकार्डची पूजा करतात अन् सुचेल त्या मोबाईल नंबरवर संपर्क करतात. ज्याला कुणाला रिंग गेली, त्याच्याशी बोलताना ते स्वत:ला अमूक एका बँकेचा अधिकारी बोलतो म्हणून सांगतात. तुमचे एटीएम / क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले. नवीन सुविधांसह ते पुन्हा सुरू करायचे आहे, असे म्हणत कार्डचा पीन नंबर, अकाऊंटनंबर आणि अन्य माहिती वदवून घेतात. संबंधितांकडून ही माहिती कळल्याच्या दुसऱ्याच क्षणी मोठ्या रक्कमेची आॅनलाईन शॉपिंग करतात. मोबाईल रिचार्ज करवून घेतात. संबंधिताच्या मोबाईलवर रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसगत झाल्याचे पीडिताच्या लक्षात येते. तोपर्यंत आरोपीचे काम झालेले असते. त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळविलेला असतो. दिवसभरात अशा प्रकारे हे आरोपी देशभरात हजारो जणांना कॉल करतात आणि प्रत्येक जण एका दिवशी किमान चार ते पाच जणांना हजारो रुपयांनी गंडवितो.
‘शॉपिंग पोर्टल’ वर विक्री
दुसऱ्याच्या रकमेने महागडी चीजवस्तू आॅनलाईन खरेदी केल्यानंतर दोन,चार दिवसानंतरच ‘ओएलएक्स, क्विकर’ सारख्या आॅनलाईन ‘शॉपिंग पोर्टल’ वर त्याची विक्रीही करतात. अशा प्रकारे प्रत्येक जण दिवसाला किमान दीड हजार ते कमाल पंचेवीसएक हजार रुपये मिळवतो.
पोलिसांची भूमिका,
अशीही अन् तशीही
दिवसभरात ठिकठिकाणी अशा प्रकारची फसवणुकीची अनेक प्रकरणे घडतात. त्यातील काही पीडित तक्रारही करतात. मात्र, आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांना बँक, मोबाईल आॅपरेटर कंपनी अन् शॉपिंग पोर्टल, अशा वेगवेगळ्या यंत्रणांची माहिती घ्यावी लागते.
प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार माहिती कळवितो. त्यात चार,सहा महिने निघून गेल्यामुळे आरोपींचा शोध घेणे कठीण काम ठरते. त्यामुळे पोलीसही फारसे गांभिर्याने गुन्ह्यांचा तपास करीत नाहीत. फारच परिश्रम घेऊन या आरोपींच्या गावात पोलीस पोहचले तरी त्यांना खाली हात परत यावे लागते. स्थानिक पोलिसांशी ‘त्यांची’ हातमिळवणी असल्यामुळे बाहेरचे पोलीस कारवाईसाठी आल्याची माहिती त्यांना लगेच कळते. त्यामुळे ते गावातून पळून जातात.
पूजा अन् नैवेद्यही
ज्या सीमकार्डच्या संपर्काने एकापेक्षा अधिक ‘सावज‘ मिळवून दिले. त्या सीमची आरोपी पूजा करतात. त्याला हार-फुलं वाहतात अन् गोड नैवेद्यही ठेवतात.

Web Title: The brawl of 'Bachanavai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.