चहापानावर बहिष्कार ! जाहिरातींचे सरकार : ‘मेक इन महाराष्ट्र’वर श्वेतपत्रिकेची विरोधकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:58 IST2018-02-26T03:58:08+5:302018-02-26T03:58:08+5:30
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य बनविले.

चहापानावर बहिष्कार ! जाहिरातींचे सरकार : ‘मेक इन महाराष्ट्र’वर श्वेतपत्रिकेची विरोधकांची मागणी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य बनविले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’वर प्रश्न उपस्थित करीत, आधीच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ परिषदेने नेमके काय दिले, याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
अधिवेशनातील रणनीती ठरविण्यास झालेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे आदींची पत्रपरिषद झाली. हे सरकार केवळ जाहिरातींचे सरकार असल्याची टीका करत विखे पाटील म्हणाले की, ३६ लाख शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात ती १९ लाख २४ हजार शेतकºयांनाच मिळाली. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, ती स्थानिक मंत्री आणि त्यांच्या सहकाºयांनी केलेली हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशातील निम्म्याहून अधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग बेरोजगारांचे मोर्चे राज्यात का निघत आहेत? कोरेगाव-भीमाच्या घटनेचा कर्ताकरविता मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना राजाश्रय आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला.
मुंडे म्हणाले, जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. बांधावरचा शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करीत आहे. छत्रपतींबाबत अपशब्द वापरला जातो, तेव्हा शिवसेना/भाजपाचे नेते, मुख्यमंत्री माफी मगत नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये गर्क असलेल्या सरकारला शिवजयंतीची जाहिरात देण्याचाही विसर पडला, अशी टीका त्यांनी केली.
चोकसीचे हिरे अन् मंत्रिमंडळातील हिरे सारखेच!
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोकसीची ‘गीतांजली जेम्स’ नामक कंपनी २-२ हजार रुपयांचे हिरे ब्रँडिंग करून ५०-५० लाख रुपयांना विकत असे. त्या मेहूल चोकसीचे हिरे आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील हिरे सारखेच आहेत. त्याचाही कारभार फक्त ब्रँडिंगवर होता. यांचाही कारभार फक्त ब्रँडिंगवरच सुरू आहे. त्यांचा उजेड काही पडत नाही, असा चिमटा विखे पाटील यांनी काढला.
विरोधकांचा आजचा मूड टिकला, तर अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटनमंत्री जयकुमार रावल विशेषत्वाने विरोधकांचे लक्ष्य असतील.
विरोधी पक्षांच्या आजच्या संयुक्त बैठकीला विखे, मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते.