दोन्ही मंत्री डेंजर झोनमध्ये : पवार कोकणात येणार का; चिपळूण-गुहागरवर साऱ्यांच्या नजरा...

By Admin | Updated: October 7, 2014 23:42 IST2014-10-07T22:13:20+5:302014-10-07T23:42:06+5:30

रत्नागिरी : मतदारसंघात व्यक्तिगत संपर्कावर भर

Both ministers in the danger zone: Pawar will come to Konkan; View of Saran on Chiplun-Guhagar ... | दोन्ही मंत्री डेंजर झोनमध्ये : पवार कोकणात येणार का; चिपळूण-गुहागरवर साऱ्यांच्या नजरा...

दोन्ही मंत्री डेंजर झोनमध्ये : पवार कोकणात येणार का; चिपळूण-गुहागरवर साऱ्यांच्या नजरा...



रत्नागिरी : आठ दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात कार्यकर्ते नेते, शिक्षक प्रचाराला लागले आहेत. यंदा प्रथमच या निवडणुकीला लाटेचे रूप प्राप्त झाल्याने जिल्हाभरातील सर्व लढती महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत म्हणून दोन मंत्र्यांविरोधात भाजपच्या उमेदवारांच्या लढाईकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरीत उदय सामंत शिवसेनेची उमेदवारी घेऊन, तर भास्कर जाधव पारंपरिक प्रतिस्पर्धी विनय नातू यांच्याशी दोन हात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता विधानसभेसाठी अद्याप एकही मोठा नेता प्रचाराला आलेला नाही.
भाजपने वेगळे लढण्याची भूमिका घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बाळ मानेंसाठी रत्नागिरीत आले. मात्र, चुरशीच्या गुहागरकडे त्यांनी पाठ फिरवली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे चिपळूणचे उमेदवार शेखर निकम यांच्यासाठी एखादी प्रचारसभा होण्याची शक्यता असली तरी खराब हवामानाचे कारण देत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलला जात असल्याने पक्षासाठी ही बाब प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दौरावगळता राष्ट्रवादीचे मिशन स्वत: निकम, माजी आमदार रमेश कदम व तालुकापातळीवरील नेते सांभाळत आहेत. मात्र, शिवसेना, भाजपच्या लढाईत निकम यांनी आपला तळ देवरूखपासून चिपळूणपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षकांचा अधिकाधिक उपयोग केल्याचे पाहायला मिळते.
सन १९८० पासून चिपळूण मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास सुरू राहिला. चिपळूणला राजाराम शिंदे, निशिकांत जोशी, सूर्यकांत खेडेकर, भास्कर जाधव, रमेश कदम व सदानंद चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघात यंदा कडवी लढत होत असून, तरूण कार्यकर्ते, युवती संघटना, विविध संस्थांमधील पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक, क्रीडा संघटना प्रचारात उतरल्या आहेत. महिलांनी प्रथमच मतदारसंघ पिंजून काढला आहे. नव्या मतदारसंघात सहभागी झाल्यानंतर देवरूख, संगमेश्वर, कसबा या भागात शिवसेनेला निकम यांना तोंड द्यावे लागत असून, काँग्रेसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे हुकमी निवडून येईल अशी जागा सध्या दिसत नाही. मात्र, गुहागरकडे राज्याचे लक्ष आहे. भास्कर जाधव, शेखर निकम हे घासून असलेल्या मतदारसंघातील दोन उमेदवार एकमेकांच्या मतसंख्येवर स्वत:चा निर्णय ठरवणार आहेत. चिपळूण मतदारसंघातील ८० वाड्यांवर भास्कर जाधव यांचे, तर त्या मतदारांचा प्रभाव असलेल्या चिपळूणमध्ये निकम यांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच या लढती महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. (प्रतिनिधी)

यापूर्वी रमेश कदम व भास्कर जाधव यांच्यातील सरळ लढतीत शरद पवार खराब हवामानाचे कारण देत पाटण येथून माघारी फिरले होते. त्या निवडणुकीत कदम पराभूत झाले, तर शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी झाले होते. यावेळी पवार यांच्या परिवारातले शेखर निकम चिपळूणमध्ये असून, पवार यांची सभा चिपळूणमध्ये होईल, या आशेवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असताना वेधशाळेने खराब हवामानाचा अंदाज व्यक्त केल्याने पवार दौरा करणार काय, असा प्रश्न केला जात आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी कदम यांना उमेदवारी दिली असली तरी या पक्षात सारे शांत असल्याने कदम यांची उमेदवारी नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार, यावरही नजरा आहेत. देवरूख पट्ट्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका निकम यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात देवरूख-संगमेश्वर पट्ट्यातील निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांची व मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या जागेकडे लक्ष आहे.

Web Title: Both ministers in the danger zone: Pawar will come to Konkan; View of Saran on Chiplun-Guhagar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.