पडिक जमीन ठरू शकते वरदान
By Admin | Updated: December 5, 2014 00:42 IST2014-12-05T00:42:21+5:302014-12-05T00:42:21+5:30
सिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.

पडिक जमीन ठरू शकते वरदान
‘नीरी’च्या संशोधकांचा दावा : शेवाळापासून जैवइंधननिर्मिती
योगेश पांडे - नागपूर
सिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेवाळापासून जैवइंधननिर्मितीसाठी अशी जमीन वापरता येऊ शकते, असा दावा ‘सीएसआयआर-नीरी’ कडून (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इस्टिट्यूट) करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पारंपरिक पद्धतीनुसार डिझेल तयार करण्याचे स्रोत मर्यादित आहेत. प्रचलित इंधनाची टंचाई व भाववाढ यांच्या पार्श्वभूमीवर या इंधनाला सशक्त पर्याय बनू शकणाऱ्या जैवइंधन किंवा बायोडिझेलनिर्मितीचे महत्त्व वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘नीरी’ने शेवाळापासून जैवइंधन तयार करण्यासाठी काही वर्षांअगोदर संशोधन सुरू केले होते. संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर हा प्रयोग यशस्वी झाला. यासंदर्भात ‘नीरी’ने पूर्ती पॉवर अॅन्ड शुगर लिमिटेड या संस्थेच्या सहकार्याने प्रकल्पदेखील कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात शेतकऱ्यांना याची लहान ‘मॉडेल’द्वारे माहिती देण्यात येत आहे. नेमकी प्रक्रिया, याचे फायदे व भविष्यातील आव्हाने सविस्तरपणे समजावून सांगण्यात येत आहेत. यासाठी ‘नीरी’च्या संशोधकांचे पथकच उपस्थित आहे.
कशी होते इंधननिर्मिती?
या संशोधनानुसार पाण्याची मोठी टाकी तयार करून शेवाळ तयार केले जाते. विशिष्ट रसायनांचा उपयोग केल्यानंतर शेवाळातील पेशींना एकमेकांपासून तोडण्यात येते. या शेवाळातून तेल काढल्यानंतर त्यावर प्रयोगशाळेत विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर जैवइंधन तयार होते. सुमारे १ किलो शेवाळापासून ३००-३५० मिली ‘बायोडिझेल’ सहज तयार होऊ शकते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीमध्ये हा प्रकल्प लावता येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे पाणी वाया जाण्याची भीती नसते. या प्रक्रियेतून तयार होणारे जैवइंधन नेहमीच्या ‘डिझेल’च्या तुलनेत महाग पडत असले तरी, भविष्यातील आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, असे मत ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले.