गुणदानाने सुटेल गिराण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:48 AM2019-07-14T04:48:15+5:302019-07-14T04:48:24+5:30

यंदा दहावीच्या बोर्डाचा निकाल कमालीचा घसरल्याने नुकतीच बंद केलेली अंतर्गत गुणदान पद्धत पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे.

Bonanza will drop off? | गुणदानाने सुटेल गिराण?

गुणदानाने सुटेल गिराण?

Next

- हेरंब कुलकर्णी

यंदा दहावीच्या बोर्डाचा निकाल कमालीचा घसरल्याने नुकतीच बंद केलेली अंतर्गत गुणदान पद्धत पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून २० पैकी दिले जाणारे हे गुण म्हणजे कुबड्या आहेत, ते देऊन विद्यार्थ्यांना अपंग करू नका, असे बहुतांश वाचकांना वाटते. तर स्पर्धेच्या जगात दिल्ली बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना मराठी विद्यार्थी मागे राहू नयेत, तसेच खडतर परिस्थितीत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अंतर्गत गुणांचा आधार आवश्यकच आहे, असे कळविणाºया वाचकांची संख्याही लक्षणीय आहे.

लेखी परीक्षेला १ गुण, प्रात्यक्षिक परीक्षेला २९ गुण व ५ गुण ग्रेस असे एक १२ वीचे गुणपत्रक मी बघितले आहे. तेव्हा असे यश आपल्याला एक समाज म्हणून हवे आहे का? हा प्रश्न केवळ अंतर्गत गुणापुरता मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांना हा खोटा आत्मविश्वास देवून आपण काय साधणार आहोत? १० वी १२ वीला असे ढकलणे सरकारला योग्य वाटत असेल तर मग मेडिकल इंजिनिअरिंगला याच गुणांच्या आधारे प्रवेश का दिले जात नाहीत? तिथे सीईटी का घेता? याचे कारण आपण कशा पद्धतीने परीक्षा घेतो व पास करतोय याची सरकारला कल्पना आहे, म्हणूनच वेगळी सीईटी घ्यावी लागते. केवळ दहावी, बारावीच नव्हे तर पहिली ते आठवीतही असेच व्यक्तिनिष्ठ भरपूर गुण देण्याची संधी आहे. महाविद्यालयात तर केवळ गाईड नोट्सच्या आधारे परीक्षा देवून पास होता येते.
अभ्यासक्रम पातळ करणे, मूल्यमापन ढिसाळ करणे आणि अंतर्गत मूल्यांकन वाढविणे हे सर्वत्र सुरू आहे. यात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढते आहे पण कौशल्य नसलेली पिढी पुढे सरकते आहे. मेळघाटातील आश्रमशाळेत दहावीला भरपूर गुण पडलेली मुले अकरावीसाठी अमरावतीला जातात आणि अभ्यासक्र्रम पेलवत नाही म्हणून मध्येच सोडून आल्याची उदाहरणे काय सांगतात? त्यामुळे केवळ २० गुण असावेत की नसावेत? इथपर्यंत हा मुद्दा नाही तर पहिलीपासून पदवीपर्यंत मुलांना त्या-त्या इयत्तेची कौशल्ये प्राप्त व्हावीत यासाठी वस्तुनिष्ठ व काटेकोर मूल्यमापन, मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष तयारी, असा दृष्टिकोन घ्यायला हवा. तोंडी परीक्षेत वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत नाही व कोणतेही पुरावे ठेवता येत नाहीत त्यामुळे ते नसावे. इतर बोर्ड जे भरमसाठ गुण देतात ते गुण त्यांना देण्यास बंदी आणावी म्हणून देशपातळीवर महाराष्ट्र सरकारने भांडायला हवे; प्रसंगी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देणार नाही, अशी टोकाची भूमिका घ्यावी. सरकारने अंतर्गत गुण न देण्याचा आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवे.
(शिक्षणतज्ज्ञ - अकोले, जि. अहमदनगर.)
>कष्टाचेच गुण घेऊ द्या
अंतर्गत गुणदान पद्धत संपूर्ण शाळेमध्ये पारदर्शक असते का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे बोगस फुकटे गुण विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल करू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना स्वत:च्या कष्टाचे गुण घेऊ द्या. गेल्या १५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणदान पद्धत नव्हती मात्र ते विद्यार्थी भावी स्पर्धेत मजबूत आहेत.
-तानाजी सयाजी म्हेत्रे, सहशिक्षक, तीर्थ बु, तुळजापूर - उस्मानाबाद.


>कायदा सर्वांना समान हवा
अंतर्गत गुणदान पद्धती बंद केल्याचे परिणाम दिसलेच. सीबीएसई आणि आयसीएससीईच्या मुलांचे गुण जास्त झाले आणि त्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळण्यास प्राधान्य मिळाले. हा सरळ राज्य बोर्डाच्या मुलांवर अन्याय आहे. कायदा सर्वांना समान हवा. त्यामुळे गुणदान पद्धती परत सुरू करावी.
- प्रिया केसकर, नीलसागर हाउसिंग सोसायटी
टाटा कॉलनी, मुलुंड (पूर्व), मुंबई
>गुणवंतांवर घाला
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता न बघता सरसकट पैकीच्या पैकी दिले जात होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, या टीकेमध्येही फारसे तथ्य नाही. प्रवेशासाठी लेखी परीक्षेत मिळालेले गुण विचारात घेतल्यास तिढा सुटेल.
- डॉ. गिरीश वि. वैद्य,
म्हाडा कॉलनी, वर्धा.
>चुकीचीच पद्धत
अंतर्गत गुणदान देणे चुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या खºया बुद्धीची कसोटी पणाला लागत नाही.विद्यार्थी सहज पास होतात. अंतर्गत गुणांची सलाईन देऊन पास करायचे असेल तर परीक्षा घेऊच नये. अंतर्गत गुणदान देऊन फक्त सुशिक्षित (बुद्धीमान नव्हे) विद्यार्थ्यांची फौज निर्माण होईल. परीक्षेचा उद्देश निकालाचा फुगवटा निर्माण करणे हा नसून हुशार विद्यार्थी निर्माण करणे हा आहे.
- राजू घुगल, लिटील एन्जल स्कूल वरोरा, जि. चंद्रपूर.
>मुख्य परीक्षेत उत्तीर्णतेची अट घाला
अंतर्गत गुणदान पद्धतीमुळे केवळ गुणांचा फुगवटा निर्माण होतो असे नाही. तर, सर्वच विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सारख्याच प्रमाणात दिल्याने ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत जास्त गुण आहेत त्यांचे नुकसानच होते. दुसरीकडे अंतर्गत गुणांच्या आधारे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बारावीत कमालीचे अपयशी होताना दिसतात.अंतर्गत गुणदान पद्धती सुरूच ठेवायची झाल्यास अंतर्गत परीक्षा व मुख्य परीक्षा यात स्वतंत्रपणे उत्तीर्ण होण्याची अट घालणे योग्य ठरेल.
- डॉ. आनंद दत्ता मुळे,
शांताई रेसिडन्सी, नळदुर्ग रोड, तुळजापूर, जि. उस्मानाबाद
> शिक्षकांना सुविधा द्या
सरकार राज्य बोर्डाची तुलना सीबीएसई व आईसीएसई यांच्याशी करत असेल तर त्यांच्या सर्व सुविधा राज्यात शिक्षकांना दिल्या पाहिजेत. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक दिल्यास तसेच गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती देण्याचे अधिकार शिक्षकांना दिल्यास, अंतर्गत गुणनदान देण्याची गरजच पडणार नाही.
- सैयद मकसुद अली पटेल, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल, यवतमाळ.
>एक देश, एक पॅटर्न असावा
आपण तुलनात्मकरीत्या महाराष्ट्र बोर्ड व केंद्रस्तरीय बोर्ड यांच्या परीक्षा व मूल्यमापन पद्धतीचा विचार केला तर कुठेतरी तफावत दिसते. यासाठी संपूर्ण देशामध्ये इयत्ता दहावीसाठीसुद्धा एकच मूल्यमापन प्रक्रिया असावी. ज्यामध्ये शंभर गुणांचा लेखी पेपर असावा. ‘एक देश एक पॅटर्न’ याप्रमाणे शिक्षणाचे धोरण ही ठरेल.
-योगेशकुमार रमेश गवते,
डी. आर. हायस्कूल, नंदुरबार.
>गुण देताना पारदर्शकता हवी
गेल्यावर्षीपासून भाषा विषयाचे अंतर्गत गुण बंद केलेले आहेत. मला वाटते, या वषार्पासून २० गुण दिले पाहिजेत. मात्र त्यात पारदर्शकता असली पाहिजे. विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणांची पध्दत ही त्याच्या बौध्दिक क्षमतेनुसार असावी, जेणे करून त्याला पुढील शिक्षणासाठी अंतर्गत गुणांचा फायदाच होईल.
- अंगद गणपतराव पेद्देवाड, सहशिक्षक, महाराष्ट्र विद्यालय, मोहा, ता.परळी वै.-बीड.


गुणदान बंदमुळे निकाल पारदर्शक
गुणदान पद्धत बंद केल्यामुळे यंदाचा दहावीचा निकाल पारदर्शक लागला आहे. आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही.शाळेचे नाव खराब नको म्हणून नववीमधील सर्वांना उत्तीर्ण केले जाते. दहावीतील विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांची खिरापत वाटून शाळेचा निकाल शंभर टक्के लागत होता. पण अंतर्गत गुण बंद केल्यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ झालेले आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांच्या कुबड्यू देवून पंगू करू नका.
-अंजली कमलाकर स्वामी,
सहशिक्षिका - मलकापूर, ता. उदगीर, जि. लातूर.
गुण आणि ज्ञान यातील फरक कळेल
अंतर्गत गुणदान पध्दती बंदच केली ते योग्य आहे. आपण गुण आणि ज्ञान यामधील फरक करायला हवा. शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा टिकवायचा असेल तर अंतर्गत गुणदान पध्दती नसावी. अट्टाहास असेल तर लेखी परीक्षेत ठराविक गुण प्राप्त करण्याची अट असावी.
-मारूती रामभाऊ दसगुडे,
पर्यवेक्षक, गेनबा सोपानराव मोझे प्रशाला,येरवडा, पुणे.
>प्रयोग नको, ठोस धोरण ठरवा
नवीन शिक्षण मंत्री आले की नवीन काहीतरी प्रयोग करायचा ही प्रथाच आपल्याकडे रूढ झाली आहे. परंतु त्या नवीन बदलामुळे काय परिणाम होईल ह्याचा सारासार विचार केला जातो की नाही, हा प्रश्न पडतो. निकालाचा फुगवटा निर्माण झाला म्हणून हा प्रयोग हे कारण काही पटण्यासारखे नाही. जर काही शाळा अवाजवी अंतर्गत गुण देत असतील तर अशा शाळांवर बोर्डाने कारवाई करावी. पण सरसकट ही पद्धत बंद करून एक प्रकारे महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. अंतर्गत गुणदान पद्धती पूर्ववत सुरू व्हायला हवी.
- नितीन कोंडिबा महानवर, शासकीय आश्रम शाळा, वडनेर, ता.कन्नड, जि औरंगाबाद.
>गरीब मुलांना फायदाच
आंतरिक गुणांना ओळखुन अंतर्गत गुण दिल्यास विद्यार्थ्यांना एक पाऊल पुढे जाण्यासाठी मदतच होते. माझ्या ओळखीचा एक मुलगा डफावर थाप टाकून उत्तम पोवाडा म्हणतो.वडील हयात नसतानातो शिक्षण घेतोय. त्याच्यासारख्या हजारो गरजू मुलांनाफायदाच होणार आहे.
- अरुणा उटीकर, जटवाडा- औरंगाबाद.
>संस्थाचालकांचा फायदा
राज्यातील बहुतांशी शाळा विविध संस्थांच्या माध्यमातून चालविली जातात. अंतर्गत मूल्यमापन करताना अशा संस्थांमधील शिक्षक हे सरसकट विद्यार्थ्याना २० पेैकी १८ ते २० गुण देऊन मोकळे होतात. त्यामागे संस्थेचा निकाल चांगला लागावा हा उद्देश असतो. पण फुकटचे २० गुण मिळवल्यानंतर लेखी परीक्षेत १५ गुण मिळवले की विद्यार्थी पास होतो. पण गुणवत्ता नसल्याने पुढे तो स्वत:च्या पायावरही उभा राहू शकत नाही. अंतर्गत गुणांचा उपयोग शिक्षणसंस्था व शिक्षकांच्या फायद्याचा आहे
-कपूरचंद देवाजी बरोदे,
सावंगी (हर्सूल) जि. औरंगाबाद.
>कलागुणांना वाव द्यावा
अंतर्गत गुणदान म्हणजे अंतर्गत उपक्रमपाहून गुण दिले जातात. हे गुणच मिळणार नसतील तर विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळणारच नाही. विद्यार्थ्यांचे वाक्चातुर्य, पाठांतर, उपक्रमातील सहभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
-शिवप्रसाद बनसोडे, शोभानगर, नांदेड.

Web Title: Bonanza will drop off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.