मराठी गीतांभोवती बॉलीवूडचा ‘पिंगा’!

By Admin | Updated: November 29, 2015 01:55 IST2015-11-29T01:55:07+5:302015-11-29T01:55:07+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत

Bollywood 'Pinga' around Marathi song | मराठी गीतांभोवती बॉलीवूडचा ‘पिंगा’!

मराठी गीतांभोवती बॉलीवूडचा ‘पिंगा’!

- सुदीप गुजराथी,  नाशिक
हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने, गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलीवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे.
अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही, काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलीवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलीवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे.
नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. ‘सिंघम’मध्ये अजय देवगणचे बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही हिट झाला होता.
‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या पात्राचे नाव शशी गोडबोले होते. ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते.

‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार : बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी, तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या १९७५ च्या चित्रपटातील ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या गीतातील शब्दही मराठीच आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही आता सिनेमे बनवत आहेत. मराठी माणूस, इतिहास, साहित्याकडे लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. मराठी भाषेसाठी हे फायद्याचेच आहे.
- कौशल इनामदार, संगीतकार

Web Title: Bollywood 'Pinga' around Marathi song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.