मुलाच्या इंजिनीअरिंगसाठी लखन उचलतोय ‘बोजा’
By Admin | Updated: June 15, 2014 00:46 IST2014-06-15T00:46:28+5:302014-06-15T00:46:28+5:30
आईवडिल, तीन लहान भाऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी एवढ्या जणांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी लखनने घरदार सोडले. नागपुरात दाखल होऊन रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. यातच मुलगा इंजिनिअर व्हावा

मुलाच्या इंजिनीअरिंगसाठी लखन उचलतोय ‘बोजा’
जीवापाड मेहनत : टिमकीत राहतो एका खोलीत
दयानंद पाईकराव - नागपूर
आईवडिल, तीन लहान भाऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी एवढ्या जणांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी लखनने घरदार सोडले. नागपुरात दाखल होऊन रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. यातच मुलगा इंजिनिअर व्हावा यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करून हाडाची काडे केली. सध्या लखनचा मुलगा जयपूरला इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.
मुलगा इंजिनिअर व्हावा म्हणून लखन जीवापाड मेहनत करीत असून उद्याचा दिवस सुखाचा येईल या आशेपोटी साऱ्या दुनियेचा ‘बोजा’ आपल्या डोक्यावर घेऊन पै-पै गोळा करीत आहे. लखन सैनी (४८) रा. बालाघाट, राजस्थान याच्या कुटुंबात आईवडिल, पत्नी, तीन भाऊ, दोन मुले आणि एक मुलगी असे एकूण नऊ जण राहतात.
मुलगा शिकतोय जयपुरात
एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षणासाठी लखनने कामाच्या शोधात नागपूर गाठले. १९९८ पासून नागपूर रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. लखन दिवसरात्र मेहनत करून मिळालेली कमाई गावाकडे पाठवायचा. हळुहळू लखनची मुलेही शिकून मोठी झाली. मोठा मुलगा बलरामने बारावीत चांगले गुण मिळविले. मुलाच्या या यशानंतर आपला मुलगा इंजिनिअरच व्हावा, अशी खूणगाठ लखनने मनाशी बांधली. परंतु इंजिनिअरींगसाठी खर्च खूप येणार असल्यामुळे एवढे पैसे कुठून आणावे या विचाराने लखन खचला. मग त्याने स्वत:लाच धीर देत काबाडकष्ट करण्याची मनोमन तयारी केली. मुलाचे जयपूरच्या व्हीआयपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन केले. इकडे दिवस-रात्र मेहनत केली. लखन सध्या टिमकीत एक खोली करून राहतो. हॉटेलचे महागडे जेवण परवडत नसल्यामुळे लखन काम करून खोलीवर गेल्यानंतर हाताने स्वयंपाक करतो. मुलाच्या राहण्याचा, जेवणाचा, कॉलेजच्या बसचा, शैक्षणिक शुल्क असा वर्षाला २ लाखाचा खर्च लखनला करावा लागत आहे. परंतु तरीसुद्धा उद्याचा दिवस सुखाचा येईल, मुलगा इंजिनिअर होईल, या आशेने लखन मेहनत करीत आहे. पुढील वर्षी मुलगा इंजिनिअरींगची पदवी घेईल आणि त्यानंतर आपण कुलीचे काम सोडून देणार असल्याचे लखननेसांगितले. मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी दुनियेचा ‘बोजा’ उचलणाऱ्या लखनच्या जिद्दीला कुणीही दाद द्यावी असेच.