बोगस पदवी देणारे गजाआड
By Admin | Updated: July 5, 2014 04:32 IST2014-07-05T04:32:45+5:302014-07-05T04:32:45+5:30
देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठांचे बोगस पदवी प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बोगस पदवी देणारे गजाआड
नवी मुंबई : देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठांचे बोगस पदवी प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १० हजार ते १ लाखांमध्ये कोणत्याही शाखेचे प्रमाणपत्र दिले जात असल्याचे स्पष्ट झाले असून अनेक राज्यांमधील हजारो विद्यार्थ्यांना बोगस पदवीधर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये टोळीचा सूत्रधार नीलेश गंगाराम डोके, प्रवीण चव्हाण व जयदेव दावणे यांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांना दक्ष नागरिकांनी शहरात बोगस प्रमाणपत्र पुरविणारी टोळी कार्यरत असल्याचे कळविले होते. अटक आरोपी २००७ पासून एस. एस. डिस्टन्स एज्युकेशन फाऊंडेशन व एस. एस. कॉलेज आॅफ डिस्टन्स एज्युकेशन या नावाने संस्था चालवत आहेत. देशातील कोणत्याही विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचे पदवी प्रमाणपत्र तयार करून देण्याचे काम करत होते. या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत पाठक व परिमंडळ एकचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी तपास सुरू केला. ३ जुलैला यामधील एक आरोपी बँकेतून ५ लाख रूपये काढण्यास येणार असल्याचे समजताच सापळा रचून प्रवीण चव्हाण यास अटक केली व त्यानंतर इतर दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आली. या टोळीने दिवाळे येथे प्रमाणपत्र बनविण्याचा छापखाना टाकला होता. तेथेही धाड टाकून संगणक, प्रिंटर, शिक्के, स्टेशनरी, विविध विद्यापीठांचे छापील पदवी व पदविका प्रमाणपत्र ताब्यात घेतले आहे. अटक केलेले आरोपी विद्यार्थ्याला १० हजार रुपये ते १ लाख रुपयांना डिग्रीची विक्री करत असत. २००७ पासून ही टोळी देशभरात अशा प्रकारचे रॅकेट चालवत असून आजपर्यंत त्यांनी हजारो बोगस डिग्रींची विक्री केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामध्ये दहावी, बारावी प्रमाणपत्र, बी. कॉम, बी. एस्सी, एम. कॉम, पी.एचडी, डी. फार्मसी, बी. फार्मसी अशा प्रकारच्या पदवी, पदविका प्रमाणपत्रांचा समावेश आहे. देशभरातील विविध ठिकाणच्या १८ हून अधिक मुक्त विद्यापीठांच्या नावाने ही बोगस प्रमाणपत्रे तयार
केली जायची. त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व अन्य ठिकाणच्या विद्यापीठांच्या नावाचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले.
विदेशातही प्रमाणपत्रे पुरविली
या ठकसेनांनी बोगस पदवी प्रमाणपत्रांची विक्री करण्यासाठी देशाची सीमाही ओलांडली आहे. आतापर्यंत विदेशातील २५
जणांना विविध विषयांच्या पी.एचडी देखील मिळवून दिल्या आहेत. त्यानसुार या विदेशी ग्राहकांचा
देखील पोलीस शोध घेत आहेत.
या विद्यापीठांचे प्रमाणपत्र पुरवले
आरोपींनी मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड विद्यापीठ, राजस्थानमधील श्रीधर विद्यापीठ पिलानी, तामिळनाडूमधील अण्णामलाई विद्यापीठ, उत्तर प्रदेश बोर्ड, उत्तर प्रदेशमधील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, मेघालयमधील टेक्नोग्लोबल विद्यापीठ अशा सुमारे १८ विद्यापीठांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)