दिव्यांग विद्यार्थी संख्येविषयी बोर्ड अनभिज्ञ
By Admin | Updated: March 6, 2017 02:42 IST2017-03-06T02:42:53+5:302017-03-06T02:42:53+5:30
दिव्यांग आणि विशेष विद्यार्थ्यांविषयी बोर्डाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही

दिव्यांग विद्यार्थी संख्येविषयी बोर्ड अनभिज्ञ
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- दिव्यांग आणि विशेष विद्यार्थ्यांविषयी बोर्डाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षेला या विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय करणे शक्य नसल्याचा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केला आहे. बोर्ड दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी अनभिज्ञ असल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले आहेत.
बारावीची परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा केंद्र बदलणे, मराठीचा पेपर व्हॉट्स अॅपवर लीक होणे अशा कारणांमुळे मंडळ चर्चेत आहे. यापुढे जाऊन बारावीचे सात दिव्यांग विद्यार्थी परीक्षा केंद्रावरील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत. पण, या विद्यार्थ्यांना मदत करु शकणार नाही असे मंडळाचे सचिव चांदेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दिव्यांग विद्यार्थी जिद्दीने बारावीची परीक्षा देत आहेत. पण, त्यांना सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून सचिवांची असंवेदनशीलतेच्या परिसीमेचे दर्शन होत असल्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
वाणिज्य शाखेतली निशिल घोडके हा विद्यार्थी सेरेब्रल पाल्सी ग्रस्त असून व्हीलचेअरवरून तो परीक्षा केंद्रावर येतो. या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र एम. के. संघवी कनिष्ठ महाविद्यालय होते. ऐनवेळी हे केंद्र बदलून जुहू येथील कै. अनंत जनार्दन म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय त्याला परीक्षेसाठी पाठवण्यात आले. या महाविद्यालयात उद्वाहनाची सोय नाही. निशिलला पहिल्या मजल्यावरची खोलीत नंबर असल्याचे सांगितले. त्याच्यबरोबर अजून ६ दिव्यांग विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. त्यामुळे सर्वांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय तळमजल्यावर करावी अशी विनंती केली. पण, ही विनंती केंद्राने फेटाळली.
एका दिव्यांग विद्यार्थ्याला चक्क प्राचार्यांच्या केबिन मध्ये परीक्षेचा पेपर लिहिण्यास बसवण्यात आले. त्यामुळे लेखनिकच्या मदतीने पेपर लिहिण्यास साहाजिकच या दिव्यांग विद्यार्थ्यावर दडपण आले होते. अन्य ६ दिव्यांग विद्यार्थ्यांची बसण्याची सोय पहिल्या मजल्यावर करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांना तर कमालीचा त्रास झाला. सहा विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांबरोबर परीक्षेला बसवले. दिव्यांग विद्यार्थी लेखनिकांना उत्तरे सांगत असताना अन्य विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी अन्य विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यांची बसण्याची वेगळी सोय करा असे सांगितले. पण, यालाही नकार देण्यात आला.
या संदर्भात दिव्यांग विद्यार्थी याच्या पालकांनी मंडळाचे सचिव चांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता सचिवांनी अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास असमर्थता दर्शविली. तसेच दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांची यादी मंडळाकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे
>परीक्षेसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांची सर्व माहिती प्रमाणपत्रांसह मंडळाला सादर केली जाते. शासकीय परिपत्रकानुसार दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याची व परीक्षेसाठी अधिक कालावधी देण्याची मुभा दिली जाते.