...तर मुंबई महापालिकेने द्यावेत पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:24 IST2017-07-26T03:24:27+5:302017-07-26T03:24:50+5:30
राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कर्जमाफीसाठी सरकारला पैसे लागणार आहेत, सरकार कुठून तरी कर्जाने रक्कम उभी करणार आहेच.

...तर मुंबई महापालिकेने द्यावेत पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कर्जमाफीसाठी सरकारला पैसे लागणार आहेत, सरकार कुठून तरी कर्जाने रक्कम उभी करणार आहेच. त्यापेक्षा मुंबई महापालिकेकडे ज्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत, ते पैसे कर्जमाफीसाठी देऊन शिवसेने बाणेदारपणा दाखवावा. बाळासाहेबांना जेवढे डोक्यावर घेतले नसेल त्यापेक्षा जास्ती ग्रामीण भागातील जनता उध्दव ठाकरेंना डोक्यावर घेईल, अशी जोरदार फटकेबाजी राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
शिवसेनेने २०१७ पर्यंत कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. तोच धागा पकडून पवार म्हणाले, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तुम्ही २०१७ पर्यंत कर्जमाफी करण्याचा ठराव विधानसभेत आणा, तुम्ही ६२ आहात आम्ही ८३ आहोत, सगळे मिळून १४५ होतात. आपण ठराव मंजूर करु. नुसतं बोलता कशाला, कृती करा, असे सांगून पवार यांनी कोणी कुठे ढोल बडवावेत की हलग्या वाजवाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे, उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.
स्वत:च्याच बँकेपुढे जाऊन शिवसेनेने ढोल वाजवले. आता काय म्हणावं यांना, असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला. शिवसेनकडून यावर कोणीही उत्तर दिले नाही.
कर्जमाफीच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाने आणलेल्या ठरावावर पवार बोलत होते. शिवसेनेने हे ३० हजार कोटी रुपये देताना त्यांना बँकांकडून जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज त्यांनी सरकारकडून घ्यावे, त्यामुळे सेनेला फरक पडणार नाही, नको तिथं जाऊन ढोल बडवण्यापेक्षा काही चांगलं काम करा, अशी कोपरखळीही पवार यांनी मारली.